PMP Tendernama
पुणे

Pune : वाहतूक व्यवस्था सुधारणार; PMPMLच्या ताफ्यात दाखल होणार 1 हजार बस

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) (PMPML) ताफ्यात १ हजार बस दाखल होणार असून, याचा निर्णय आज (ता. १३) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये ५०० बस खरेदीसाठी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका निधी देणार आहे. तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) स्वतंत्रपणे ५०० बस घेतल्या जाणार आहे. संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.

शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. खासगी गाड्यांऐवजी सार्वजनिक बसचा वापर केल्यास कोंडीतून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. जास्तीत जास्त नागरिकांनी पीएमपीची सेवा वापरावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असले तरी बसची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक बसची दुरावस्था झालेली असतानाही त्या रस्त्याने धावत आहेत, त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ही बस खरेदी महत्त्वाची आहे. या एक हजार बस सीएनजीवरच्या असणार असून, त्यांची लांबी १२ मीटर इतकी असणार आहे. या प्रत्येक बसची किंमत साधारणतः ४८ लाख इतकी असण्याची शक्यता आहे. ही बस खरेदी करण्यासाठी पीएमआरडीएकडे २३० कोटींची तरतूद उपलब्ध आहे.

नवीन बस खरेदीचा तपशील

पुणे व पिंपरी-चिंचवडची बस खरेदी

पुणे महापालिकेचा वाटा - ६० टक्के

पिंपरी महापालिकेचा वाटा - ४० टक्के

पुणे मनपाच्या बसेस - ३०० (खर्च १४४ कोटी)

पिंपरी चिंचवडच्या बसेस - २०० (खर्च ९६ कोटी)

पीएमआरडीएची बस खरेदी : ५०० बस

पीएमआरडीएकडील तरतूद - २३० कोटी

पीएमपीएमएलच्या ताफ्यातील बस : १,९१६

दैनिक प्रवासी संख्या: सुमारे १२ लाख प्रवासी

नादुरुस्त बस : ३०० ते ३५०

शहरासाठी आवश्यक बस ६ हजार

‘‘पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ५०० आणि पीएमआरडीएतर्फे ५०० बस खरेदी करण्याचा प्रस्ताव आज मान्य केला आहे. याची टेंडर प्रक्रिया सुरु होऊन लवकरच या बस ताफ्यात समाविष्ट होतील.’’

राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका