Pune City Tendernama
पुणे

PMC : खडकवासला, धायरी, नऱ्हे, आंबेगावचा निधी बाणेर, बालेवाडीला कोणी पळवला?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर असल्याने यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली होती. मात्र, यामधील तब्बल ३८.५० कोटी रुपयांची तरतूद बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील माननीयांना खूष करण्यासाठी वळविण्यात आली आहे. या निधी पळवापळवीचा फटका बाणेर, बालेवाडीपेक्षा कमी विकसित असलेल्या भागाला बसणार आहे.

पुणे महापालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा मास्टरप्लान तयार करणे, यासाठी दहा कोटीची तरतूद केली होती. तंत्रशुद्ध पद्धतीने पाणीपुरवठा करणे या कामासाठी दहा कोटी, शहराच्या विविध भागातील रस्ते डांबरीकरण करणे १८.५० कोटी अशी एकूण ३८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांपैकी सूस, म्हाळुंगे, लोहगाव, वाघोली या गावांचा पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार झाला आहे. तेथे कामही सुरू झाले आहे. पण खडकवासला, धायरी, नऱ्हे, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव या गावांचा अजूनही आराखडा तयार झाला नाही.

तसेच या गावांमधील रस्त्याची स्थिती वाईट असल्याने तेथे डांबरीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती.

महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने शहराच्या सर्वच भागात कामे खोळंबली आहेत. प्रत्येक भागात निधीची गरज असताना बाणेर, बालेवाडी, सूस भागातील काही माननीयांनी वजनदार नेत्यांचा दबाव आणून या भागासाठी खास निधी मंजूर करून घेतला. त्यासाठी पाणीपुरवठा आणि पथविभागाने निधी वर्गीकरण करून दिला आहे.

या निधीतून खराब सांडपाणी वाहिनी बदलणे, पावसाळी गटार टाकणे, रस्ते डांबरीकरण करणे, रस्ते विकसित करणे, खड्डे बुजविणे अशा कामांसाठी तब्बल ३८.५० कोटी रुपये वर्गीकरण करून घेतले आहेत.

विकासाचा असमतोल...

- इतर भागाच्या तुलनेत बाणेर, बालेवाडी, सूस, पाषाण या भागात नागरी सुविधा चांगल्या आहेत

- ज्या भागातील पाणी पुरवठा, रस्त्‍यांसाठी निधीची तरतूद केली होती, तेथील निधी वळवला

- निधी थेट विकसित भागात देण्यात आला आहे

- राजकीय दबावामुळे शहरातील विकासाचा असमतोल यानिमित्त पुढे आला आहे.

तेथील लोकप्रतिनिधींनी दौरा केला होता. त्यावेळी तेथील कामे मार्गी लावण्यासाठी निधीची गरज असल्याची मागणी केली होती. त्यामुळे हा निधी देण्यात आला आहे. वर्गीकरण केलेला निधी योग्य ठिकाणी खर्च पडतो की नाही, ज्या कामासाठी निधी दिला आहे, तेथे काम झाले की नाही, याची व्यवस्थित तपासणी केली जाईल.

- डॉ. राजेंद्र भोसले. आयुक्त, पुणे महापालिका