Mula Mutha Rivers Tendernama
पुणे

Pune: अखेर तोडगा निघाला; 5 वर्षांपासून रखडलेला जायकाचा 'तो' प्रकल्प लवकरच ट्रॅकवर?

JICA Project: मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत १४७२ कोटी रुपये खर्च करू ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत औंध येथील जैवविविधता उद्यानात (बॉटेनिकल गार्डन) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यासाठी जागा मिळविण्यासाठी महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. (Mula Mutha Rivers News)

महसूल व वन विभागाने या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या ३० गुंठे जागेवरील बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइटचे आरक्षण उठवले आहे. आता ही जागा ताब्यात मिळून काम करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेने अर्ज केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करता येणार आहे.

मुळामुठा शुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत (जायका) १४७२ कोटी रुपये खर्च करू ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत आहे. पण भूसंपादनातील अडथळ्यांमुळे अनेक ठिकाणी कामे सुरू करता आलेले नाहीत.

अखेर जागा ताब्यात आल्यानंतर ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपैकी १० ठिकाणी काम सुरू केले आहे. या प्रकल्पांचे एकूण सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.

या ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये औंध येथे कृषी महाविद्यालयाच्या जागेत १० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. पण ही जागा मिळविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून महापालिका पाठपुरावा करत होती. पण या परिसरातील ३२ हेक्टर जागेवर जैवविविधता वारसास्थळाचे आरक्षण होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करत येत नाही.

पर्यावरणाच्या अभ्यासासाठी ही जागा महत्त्वाची आहेत. त्यामुळे या ठिकाणी काम करण्यास मान्यता देण्यासाठी कृषी विभागाने महापालिकेला नकार दिला होता. त्यासाठी महापालिका आणि शासनस्तरावर बैठका झाल्या आहेत. पण त्यावर तोडगा निघत नव्हता, त्यामुळे हे काम रखडले आहे.

काय झाला निर्णय?

- या प्रकल्पाचे काम पर्यावरण रक्षणासाठी आहे असे सांगण्यात महापालिकेला यश

- त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडून ही जागा एसटीपीसाठी महापालिकेला हस्तांतर करण्यास काही हरकत नसल्याची भूमिका घेत ३० गुंठे जागा महापालिकेला हस्तांतर करण्याची शिफारस

- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनीही अटी-शर्ती टाकून ही जागा महापालिकेला देण्याची तयारी दर्शविली

- त्यामुळे ही ३० गुंठे जागा जैवविविधता वारसास्थळाच्या क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला