भोसरी (Bhosari) : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरातील काही रस्त्यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) सिमेंट काँक्रिटीकरण तर काही रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. मात्र त्यावर गटार आणि पावसाळी जल वाहिन्यांच्या चेंबरच्या कामांत महापालिकेचा स्थापत्य विभाग अपयशी ठरला आहे. काही चेंबरची पातळी रस्त्याच्यावर तर काहींची रस्त्याच्या खाली असल्याने वाहन चालकांना रस्त्याने वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दुचाकी चालकांचे अपघातही होत असल्याने त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील चांदणी चौक ते लांडेवाडी चौक, लांडेवाडीतील अग्निशमन केंद्र ते बापूजीबुवा चौक, बापूजी बुवा चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि मारुती मंदिर व शांतीनगरकडे जाणारे रस्ते, पीसीएमसी चौक ते आदिनाथनगर, आळंदी रस्त्यावरील कै. सखूबाई गवळी उद्यान ते दिघी रस्ता, दिघीतील भारतमातानगर ते आळंदी रस्ता आदी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तर उर्वरीत रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाने रस्ते गुळगुळीत झाले आहेत. मात्र त्यावर चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर चेंबरजवळ खड्डे पडले आहेत. तर इतर रस्त्यांवर गटाराच्या चेंबरची पातळी काही ठिकाणी रस्त्याच्याखाली तर काही ठिकाणीवर आहे. त्याचप्रमाणे काही चेंबरजवळील सिमेंट नाहीसे झाल्याने त्याच्या सभोवताली खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावरून जाताना आदळत आहेत. अशा चेंबरवरून दुचाकी वाहने गेल्यावर ती घसरून वाहन चालकांना अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे वाहने आदळून वाहन चालकांना पाठदुखीचा त्रास वाढण्याबरोबर त्यांच्या वाहनांचेही नुकसान होत आहे.
इथे आहेत धोकादायक चेंबर...
भोसरी : पीसीएमसी चौक, लांडेवाडीतील विकास कॉलनी, अग्निशमन केंद्राजवळ, भोसरीतील संत तुकारामनगरातील संत तुकाराम मंदिरासमोरील रस्ता, कृष्ण मंदिरासमोरील रस्ता, दिघी रस्ता, आळंदी रस्ता, गंगोत्रीपार्कमधील न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणारा रस्ता, गिर्यारोहक कै. रमेश नारद गुळवे मार्ग.
इंद्रायणीनगर : इंद्रायणीनगरकडून ओमनगरीकडे जाणारा रस्ता, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलासमोरील रस्ता, पेठ क्रमांक दोनमधील माऊली रेसिडेन्सीसमोरून यशवंतराव चव्हाण चौकाकडे जाणारा रस्ता, राधाकृष्ण मंदिर ते नाना-नानी उद्यानाकडे जाणारा रस्ता, संतनगर चौक ते स्पाइन सिटी चौकाकडे जाणारा रस्ता.
दिघी : भारतमातानगर ते आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता, पुणे-आळंदी रस्ता ते गायकवाड नगरकडे जाणारा रस्ता, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयासमोरील रस्ता, विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर माऊलीनगर-साई पार्कसमोरील रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक, सह्याद्री कॉलनी क्रमांक दोन समोरील रस्ता.
नागरिकांना पडणारे प्रश्न...
पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे रस्त्याची कामे होताना त्यावरील चेंबरच्या कामाकडे का दुर्लक्ष केले जात आहे ? चेंबर कसे बांधावे ? याची नियमावली अथवा तज्ज्ञ महापालिकेकडे नाहीत का ? चेंबरच्या बांधणीकडे महापालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का ?
झाकणे तुटण्याच्या प्रमाणात वाढ
भोसरीतील चांदणी चौक ते लांडेवाडी चौकापर्यंत रस्त्यासह बापुजी बुवा चौक ते शांतीनगरमधील रस्त्यावरील चेंबरची सिमेंटची झाकणे वाहनांमुळे वारंवार तुटत आहेत. महापालिकेने काही झाकणे पुन्हा नव्याने बसविले आहेत. मात्र ती देखील तुटत आहेत. या प्रकारामुळे चेंबरच्या दर्जाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
वाहते चेंबर
भोसरीतील नाशिक - पुणे महामार्गावर सद्गुरु डेपो चौकाजवळ, भोसरीतील आळंदी रस्त्यावरील हुतात्मा चौकाजवळील पाचारणे चाळ, भोसरीतील इंद्रायणीनगरातील राधाकृष्ण मंदिरासमोर आदी भागांतील गटाराचे चेंबर वारंवार तुंबून त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. विशेष म्हणजे या तीनही चेंबरमधून गेले तीन-चार वर्षांपासून पाणी वाहत असतानाही महापालिकेला यावर कायमस्वरुपी उपाय करता आलेला नाही.
इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरातील गटाराच्या चेंबरची पाहणी करण्यास कनिष्ठ अभियंत्यांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या समपातळीत नसणाऱ्या चेंबरचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. सारथीवर चेंबरविषयी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून यापूर्वीही चेंबरची दुरुस्ती केली आहे.
- सुनिलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
रस्त्याचे डांबरीकरण करत असताना पावसाळी जलवाहिन्या अर्थात स्ट्रॉम वॉटर लाइनच्या चेंबरची दुरुस्ती करण्यात येते. परिसरातील पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची पाहणी करून त्या दुरुस्त करण्यात येतील.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय
गटाराच्या चेंबरच्या दुरुस्तीसाठीची निविदा काढण्यात आली आहे. त्यावर प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील चेंबरच्या दुरुस्तीचे लवकरच आदेश काढून त्यांच्या दुरुस्तीच्या कामास सुरूवात करण्यात येईल.
- राजेंद्र डुंबरे, उपअभियंता, जलनिःसारण ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय