Nagpur
Nagpur Tendernama
पुणे

पुणे तिथे काय उणे! रस्ता सिमेंट कि डांबरी या वादात काम झाले ठप्प

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभात रस्ता डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. पण स्थानिक नागरिकांनी हा रस्ता सिमेंटचा नको, डांबरीकरणच करावे, अशी मागणी करत यास विरोध दर्शविलेला असताना या रस्त्याचे काम ठप्प झाले आहे.

गेल्या दोन तीन वर्षांत झालेल्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत या खराब रस्त्यांचा पुणेकरांना त्रास सहन करावा लागला आहे. आता आगामी वर्षांत रस्ते चांगले व्हावेत यासाठी महापालिका प्रशासनाने सहा पॅकेजमध्ये साडे तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली. त्यातील पहिल्या पॅकेजमध्ये सुमारे ५७ कोटी रुपयांची कामे केली सुरू केली आहेत. त्यामध्ये एक प्रभात रस्त्याचा समावेश आहे. पावसाळ्यामध्ये विधी महाविद्यालयाच्या पाठीमागच्या टेकडीवरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून येत असल्याने दरवर्षी रस्त्यावरील खडी वाहून जात त्यामुळे विधी महाविद्यालय ते डेक्कन जिमखान्यापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा काँक्रिटीकरण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा रस्ता सिमेंटचा होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध करत हा रस्ता डांबरीच ठेवण्याची मागणी केली आहे. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढणार, पादचारी मार्ग खाली जाणार, बंगल्यांमध्ये पावसाचे पाणी घुसण्याचा धोका, तसेच सिमेंट रस्ता खोदल्यास तो पुन्हा दुरुस्त होणार नाही. त्यामुळे त्यास विरोध करत महापालिका आयुक्तांकडेही लेखी तक्रार करण्यात आली. नागरिक आणि अधिकाऱ्यांनी एकत्र पाहणी केली तरीही नागरिकांचा विरोध कायम आहे. तसेच या भागातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे.

रस्ता उकरून काम बंद

प्रभात रस्ता पूर्णपणे बंद केल्यास वाहतूक कोंडी होईल यामुळे पथ विभागाने टप्प्याटप्प्याने काम हाती घेतले आहे. विधी महाविद्यालय ते कॅनॉल रस्ता या दरम्यान रस्ता खरडून ठेवला आहे. पण काँक्रिटीकरणास विरोध केल्याने आता हे काम बंद पडले आहे. त्यामुळे प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता व अंतर्गत गल्ल्यांमध्ये वाहतुकीचाही खोळंबा होत आहे.

प्रभात रस्त्याच्या परिसरात मोठ्या इमारती उभ्या राहात आहेत. त्यामुळे पाणी, सांडपाणी याची क्षमता वाढली पाहिजे. प्रभात रस्ता सिमेंटचा करू नये यासाठी आमच्या सोसायटीच्या बैठकीत चर्चा झाली, सह्यांची मोहीम राबवून त्या आयुक्तांकडे दिल्या आहेत. आयुक्तांनी आमच्यासोबत रस्त्याची पाहणी करावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले, पण त्यापूर्वीच रस्ता खोदून ठेवला. सिमेंटचा रस्ता केल्याने तो पुन्हा खोदला तर खराब होणार तसेच रस्त्याची उंची वाढून बंगल्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरणच केले पाहिजे.

- योगेश आपटे, सहसचिव, डेक्कन जिमखाना को. ऑप. सोसायटी

प्रभात रस्त्याचे काम पॅकेज एकमधून केले जात असून, प्रभाग रस्त्यावर टेकडीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येते त्यामुळे तो काँक्रिटचा केला जात आहे. यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद आहे.

- व्हि. जी. कुलकर्णी, प्रमख, पथ विभाग