PCMC Tendernama
पुणे

PCMC : महापालिकेच्या कोट्यवधीच्या खर्चाचा 'कचरा'; काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी ‘रोड स्वीपर’ मशिन घेतले आहेत. या मशीनमुळे शहरातील रस्ते स्वच्छ आणि धूळ, कचरा यापासून मुक्त होतील, अशी आशा शहरवासीयांना व महापालिका प्रशासनाला होती. परंतु मागील काही वर्षांपासून शहरात रस्ते साफसफाईसाठी घेतलेले स्लीपर मशिन केवळ रस्त्यांवर धावताना दिसत आहे. परंतु रस्त्यातील माती कचरा धूळ जागेवर दिसून येत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने राबविलेला हा प्रकल्प वाया गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याची चर्चा मागील काही वर्षांपूर्वी सुरू होती. त्यानुसार महापालिकेने टेंडर काढून संबंधित ठेकेदारांना यंत्रांची खरेदी करायला लावली. त्यात बराच काळ गेला. अनेक वेळा मुहूर्तही पुढे ढकलण्यात आले.

सर्व अडीअडचणींवर मात करून महापालिकेने अखेर यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांचे साफसफाई करण्यास सुरुवात केली. प्रथम शहरातील १८ मीटर रस्ते व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्त्यांची या यंत्राद्वारे साफसफाई करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करून रस्ते साफसफाईचे काम देण्यात आले. त्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु शहरातील रस्त्यांवर धूळ, माती, कचरा तसाच दिसून येत आहे. परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी आहे.

महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील रस्त्यांची सफाई कर्मचाऱ्यांद्वारे करून घेत होते. तेव्हा जी परिस्थिती शहरात दिसून येत होती तीच परिस्थिती कोट्यवधी रुपये खर्च करून देखील आहे. यामुळे करदात्या नागरिकांना ही यांत्रिकी साफसफाई नेमकी रस्ते साफसफाईसाठी आहे की नागरिकांनी कररूपी पैसा जो महापालिकेला दिला आहे तो साफ करण्यासाठी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुन्हा साफसफाई कर्मचारीच रस्त्यावर

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरातील रस्त्यांची झाडूने साफसफाई करतात. शहरातील अंतर्गत रस्ते प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी साफ करून घेतात. मोठे रस्ते साफ करण्यासाठी महापालिकेने यांत्रिकी पद्धतीचा वापर केला आहे. परंतु ही यंत्रे केवळ रस्त्यावरून धावताना दिसत आहेत.

कचरा आणि माती रस्त्यावरच राहत असल्याने आरोग्य विभागाचे साफसफाई कर्मचारी मोठ्या रस्त्यांवरती साफसफाई करून मातीचे ढीग तयार करून ठेवत आहेत. यामुळे यांत्रिकी साफसफाईचा नेमका उपयोग काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

या मार्गांवर होते साफसफाई

स्पाईन रस्त्यावर यांत्रिकी पद्धतीने साफसफाई केली जाते. परंतु यंत्राद्वारे व्यवस्थित साफसफाई होत नसल्याने आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी रस्त्याची साफसफाई करून कचऱ्याचे ढीग तयार करून ठेवत आहेत. त्यानंतर कचरा वाहतूक गाडी येऊन सफाई कर्मचारी तो कचरा भरून येत आहेत.

हीच परिस्थिती आळंदी-देहू मार्गावर महापालिका हद्दीत दिसून येते. आळंदी-पुणे पालखी मार्गावर देखील असेच काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

आळंदी देहू मार्गावरील डुडुळगाव ते तळवडे रस्ता रोड स्वीपर मशीनकडे साफसफाईसाठी दिला होता. परंतु या मार्गावरील यांत्रिकी पद्धतीने होणारी साफसफाई थांबविण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी या रस्त्याची सध्या साफसफाई करत आहेत.

- अमित पिसे, आरोग्य निरीक्षक ई क्षेत्रीय कार्यालय

महापालिकेने शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी रोड स्वीपर मशीन घेतले. यामुळे रस्ते व पदपथ स्वच्छ होतील, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा होती. परंतु हे मशीन केवळ रस्त्याने धावताना दिसत आहे. रस्ते मात्र साफ होत नसल्याने स्थानिक नागरिकांना व्यवसायिकांना तसेच वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यांत्रिकी पद्धतीने होणारी रस्ते सफाई ही केवळ महापालिकेची लूट करणारी यंत्रणा आहे.

- अशोक जाधव, स्थानिक रहिवासी