Mumbai : 'केईएम' रुग्णालयात उभी राहतेय 21 मजली इमारत; 100 कोटींचे टेंडर 'त्या' कंपनीच्या खिशात
मुंबई (Mumbai) : केईएम रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी वसाहत पाडून त्या ठिकाणी २१ मजली इमारत बांधली जात आहे. या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी मुंबई महापालिका विविध करांसह सुमारे १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ११ टक्के कमी दराने टेंडर भरत 'वितराग इन्फ्रा प्रोजेक्ट एलएलपी' कंपनीने हे काम मिळवले आहे. ही इमारत येत्या तीन वर्षांमध्ये बांधून पूर्ण केली जाणार आहे.
परळमधील केईएम रुग्णालयाच्या आवारातील पाच बांधकामे पाडून त्यावर तळ मजला अधिक पहिला मजला ते एकवीस मजले अशाप्रकारे कर्मचारी वसाहतीची इमारत बांधली जाणार आहे. आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्यावतीने स्थळ पाहणी केल्यानंतर या इमारत बांधकामाचा आराखडा बनवण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने टेंडर मागवली असून त्यामध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे ११ टक्के कमी दराने बोली लावून हे काम मिळवले आहे. या कामासाठी 'वितराग इन्फ्रा प्रोजेक्ट एलएलपी' कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध करांसह सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या इमारत बांधकामात पाणी पुरवठा आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांचे काम करणे, वर्ष जलसंचयन, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम तसेच व्यायामशाळा, धुलाई केंद्र, अग्निविरोधी कामे आदींचा समावेश आहे. या २१ मजली कर्मचारी भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ जानेवारी रोजी पार पडले.
तसेच केईएम रुग्णालय परिसरातील डीन बंगल्यासह जुन्या तीन इमारती आणि भांडारगृह पाडून तिथे केईएम रुग्णालयाच्या शतकपूर्ती वर्षांची आठवण म्हणून ३२ मजली शताब्दी अर्थात सेंटेनरी टॉवर उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. केईएम रुग्णालयात दरवर्षी सुमारे २५ लाख बाह्य रुग्ण उपचार घेतात त्यामुळे रुग्णालयाचे बेड नेहमीच फुल्ल असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता मध्य मुंबईतील या महत्वाच्या व मोठ्या रुग्णालयात येणाऱ्या शतकपूर्ती वर्षात सुसज्ज ३२ मजली नवीन इमारत बांधण्यासाठी तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी आहे. रुग्णालय येत्या वर्षी शतकपूर्ती महोत्सव साजरा करीत आहे. सध्या रुग्णालयातील विविध इमारतींमध्ये २२०० बेड विखुरलेले आहेत. या जुन्या इमारती हेरीटेजमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान / अद्ययावत उपकरणे बसविण्यासाठी इमारतीमध्ये संरचनात्मक बदल करता येत नाहीत.