पुणे (Pune): पुणे शहराच्या पश्चिम भागातील डोंगरउतारांवरून येणारे पाणी नाल्यांद्वारे नदीला मिळण्याच्या नैसर्गिक व्यवस्थेला फाटा देत महापालिकेकडून डोंगरउतारांजवळील, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) महामार्गालगतचे अनेक नाले वळविण्यासह बंद करून नाल्यांचा गळा घोटण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
नालेच बंद केल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर येऊ लागले आहे. त्याचबरोबर अनेक सोसायट्यांमध्ये, पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याने तेथील रहिवाशांना आर्थिक व शारीरिक ताण सहन करावा लागत आहे. कोथरूड, बावधन, चांदणी चौकासह शहराच्या अनेक भागात सध्या ही परिस्थिती आहे.
गृहप्रकल्प, रस्ते, महामार्ग यांच्यासह विविध प्रकल्प व विकास कामांसाठी शहरातील डोंगरउतारावरील जागा दिली जाते. त्यानुसार, संबंधित ठिकाणी विकासकामे होतात. मात्र, ही विकासकामे होत असतानाच त्याच्या आड येणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचीच वाट लावण्याचा प्रकार शहरात सुरू आहे.
बांधकाम प्रकल्पांसह विविध कामे व्यवस्थित होण्यासाठी वर्षानुवर्षे डोंगरांमधून वाहणाऱ्या नैसर्गिक पद्धतीने ओढे-नाल्यांच्या प्रवाहांनाच अडथळे निर्माण केले जात आहेत. बावधन, चांदणी चौक, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कोथरूड, वारजे, बालेवाडी या ठिकाणांसह विविध ठिकाणांहून वाहणाऱ्या नाल्यांना महापालिका प्रशासन तसेच ‘एनएचआयए’कडून वळविण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संबंधित ओढ्या-नाल्यांना बंदिस्त करण्याबरोबरच अनेक ठिकाणी ओढे-नाले थेट बंद केल्याचे चित्रही शहराच्या वेगवेगळ्या भागांत आहे.
अशी आहे स्थिती
- ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने किंवा ते बंद केल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर साठण्याचे, सोसायट्यांच्या पार्किंग, लिफ्ट, क्लबहाउस अशा ठिकाणी घुसण्याच्या घटना मागील काही वर्षांपासून घडत आहेत
- बावधन, चांदणी चौक, वारजे, कोथरूड या परिसरासह शहराच्या वेगवेगळ्या भागांत ओढे-नाले वळविल्याच्या घटनांचा फटका बसू लागला आहे
- विशेषतः ‘एनएचआयए’कडून महामार्गालगतचे अनेक ओढे-नाल्यांचे प्रवाह बंद करण्यात आले आहेत
- त्यामुळे पावसाळ्यात पाणी महामार्गाच्या भिंतींमधून थेट निवासी क्षेत्रात घुसत आहे
- सलग दोन वर्षांपासून हा फटका संबंधित भागांत राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे
- नागरिकांनी महापालिका, ‘एनएचआयए’ यांच्याकडे वारंवार तक्रारी करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत तोडगा निघालेला नाही
...तर शिंदेवाडीची पुनरावृत्ती ?
वाकड ते कात्रज महामार्गावर ठिकठिकाणी डोंगर, टेकड्या फोडून विकासकामे केली आहेत. त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने वाहणारे ओढे-नाले वळविले किंवा बंद केले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक पद्धतीने वाहून जाण्याच्या मार्गांवर अडथळे निर्माण झाले आहेत. काही वर्षांपूर्वी शिंदेवाडी, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने मनुष्य व वित्तहानी झाली होती. ओढे-नाले वळविण्यामुळे व बंद करण्यामुळे त्यांच्या प्रवाहाला अडथळे येऊ लागले आहेत. परिणामी, मुसळधार पाऊस झाल्यास शिंदेवाडीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोंगरावरून येणारे पाणी नाल्याद्वारे पावसाळी वाहिन्यांत सोडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नाल्याच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. परिणामी रस्त्यावर पाणी साठल्यानंतर ते सोसायटीचे पार्किंग, लिफ्टमध्ये शिरते. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केवळ पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी करावा लागत आहे.
- सचिन पवार, अध्यक्ष, व्हिन्टेज हाय डी सोसायटी, बावधन
महापालिका व ‘एनएचआयए’ यांच्याकडून ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला किंवा ते बंद करण्यात आला. त्यामुळेच अनेक सोसायट्या, घरांमध्ये पाणी शिरत आहे. मात्र महापालिका व ‘एनएचएआय’ प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
- प्रशांत कनोजिया, सामाजिक कार्यकर्ते.