chandrakant patil Tendernama
पुणे

पुणे महापालिकेतील टेंडर गैरव्यवहारांबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, आता अजितदादांसोबत...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत एका मागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर येत आहेत. मर्जीतील ठेकेदाराच्या भल्यासाठी कोट्यवधींचे टेंडर काढले जात आहेत. प्रशासक काळात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत असूनही सत्ताधाऱ्यांचे त्यावर नियंत्रण नाही. अशा स्थितीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी डांबर खरेदी गैरव्यवहार, सुरक्षारक्षक नियुक्ती, नाले सफाई टेंडरमधील घोळ यांसह अन्य विषयांवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात पाटील यांनी महापालिकेत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी येथील ग. दि. माडगूळकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. प्रशासक राजवटीत पुणे महापालिकेचे नुकसान होणारे अनेक निर्णय होत आहेत. डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे दिलेले असले, तरी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. सुरक्षारक्षक नियुक्ती आणि टेंडर प्रक्रियेवरून आरोप झालेले आहेत. नाले सफाईच्या कामात संगनमत करून कामे घेण्यात आली आहेत.

याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘महापालिकेतील गैरप्रकारासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. त्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. उशिरा जागा मिळत असल्याने भूसंपादनाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे बाणेर - बालेवाडी यासह कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंकचे रस्ते करण्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. कोथरूडमध्ये पाणीपुरवठा विभागामार्फत कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे. त्याबाबतही सूचना केल्या आहेत. पाषाण तलाव सुशोभीकरणासाठी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. बाणेर - बालेवाडी भागात नाट्यगृहासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे.’’