Pune Metro Tendernama
पुणे

Metro : PCMC भवन ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाली तरी 'या' स्थानकांचे काम का रखडले?

Pune Metro : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर (दिवाणी न्यायालय) या मेट्रो मार्गिकेचे उद्‍घाटन झाले. नंतर वर्षभरातच स्वारगेटपर्यंत या मार्गाचा विस्तार झाल्याने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे अंतर अवघ्या काही मिनिटांत कापणे शक्य झाले.

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका (PCMC - Shivajinagar Metro Line) दीड वर्षापूर्वी सुरू झाली. त्यामुळे शहरातील पिंपरी, वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी स्थानकांवरून पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली.

मात्र, याच मार्गिकेवरील पुण्यातील खडकी व रेंज हिल्स या दोन मेट्रो स्थानकांची कामे अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे खडकी बाजार, रेंजहिल्स, औंध रस्ता, विद्यापीठ, भोसलेनगर, सिंचननगर भागात जाणाऱ्या वा येणाऱ्या प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक अद्याप मेट्रो सेवेपासून वंचित राहिले आहे.

मेट्रोचा विस्तार झाला, स्टेशन कधी?

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर (दिवाणी न्यायालय) या मेट्रो मार्गिकेचे उद्‍घाटन झाले. या मार्गावरील मेट्रो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर वर्षभरातच स्वारगेटपर्यंत या मार्गाचा विस्तार झाल्याने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे अंतर अवघ्या काही मिनिटांत कापणे शक्य झाले. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली.

दरम्यान, शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत करण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली व त्याचे कामही सुरू झाले. मात्र, तरीही याच मार्गावरील खडकी व रेंजहिल्स ही दोन स्टेशन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली नसल्याने येथून पुण्यात किंवा पिंपरी-चिंचवडकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

हे भाग जोडले जाणार

निगडी ते स्वारगेट या मार्गावर चौदा मेट्रो स्टेशन आहेत. त्यातील खडकी मेट्रो स्टेशन सुरू झाल्यास खडकी, खडकी स्टेशन खडकी बाजार या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना मेट्रोसाठी बोपोडी स्टेशनवर यावे लागत आहे

भोसलेनगर, रेंजहिल्स या भागातून शहरात जाण्यासाठी सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा नसल्याने प्रवाशांना मुंबई-पुणे महामार्ग किंवा गणेशखिंड रस्ता या दोन दोन ठिकाणी यावे लागते. रेंजहिल्स हे स्टेशन सुरू झाल्यास येथील नागरिकांना स्वारगेट, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये सहजरित्या प्रवास करता येणार आहे.

आम्ही बोपोडी आणि खडकीच्या मधल्या परिसरात राहतो. येथून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांची वर्दळ आणि रस्‍त्याची सुरू असलेली कामे यामुळे बोपोडी स्टेशनला पायी येणे शक्य होत नसून, दोन स्टेशनमधील अंतर असल्याने रिक्षाचालकही नकार देतात. येथून पुण्यात कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, स्टेशन सुरू नसल्याने प्रवाशांना उलटे बोपोडीला यावे लागते.

- तनिश खंडागळे, बोपोडी

मी खडकीत राहते. येथून कुठेही जाण्यासाठी मेट्रोचा पर्याय उत्तम आहे. मात्र, मेट्रो सेवा सुरू होऊन दीड वर्ष लोटले तरी खडकी स्थानक सुरू झालेले नाही. कुठेही जायचे झाले तरी बोपोडी स्थानकावर यावे लागते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असेल तर अजून त्रास होतो.

- शिल्पा पालखे, रहिवासी, गोपी चाळ

खडकी व रेंजहिल्स या दोन्ही मेट्रो स्थानकांची कामे प्रगतिपथावर आहेत. खडकी रेल्वे स्थानकाचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. मात्र रेंजहिल्स स्थानकाचे काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागू शकतो.

- हेमंत सोनावणे, सरव्यवस्थापक व कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो

अपूर्ण असलेली कामे

- मेट्रो स्टेशनच्या बाहेरच्या भिंतीचे बांधकाम

- सुशोभिकरणाचे काम

- सरकते जिने व जिन्यांचे काम अपूर्ण

- मेट्रो स्थानकाच्या आतील सुशोभिकरणाच्या कामाला प्रारंभ नाही

- तिकीटांच्या स्कॅनरची उभारणी नाही