मुंबई (Mumbai): केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'स्मार्ट सिटी मिशन' अंतर्गत महाराष्ट्रातील शहरांमध्ये झालेल्या हजारो कोटींच्या कामांच्या दर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला आहे. केवळ एलईडी दिवे लावल्याने किंवा रंगरंगोटी केल्याने शहरे स्मार्ट होत नाहीत, अशी घणाघाती टीका करत त्यांनी पहिल्याच पावसात मुंबई, पुणे आणि ठाणे ही शहरे तुंबण्यावर प्रशासनाला धारेवर धरले. विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना जयंत पाटील यांनी विविध शहरांमधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आणि नियोजित प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचाराचा सविस्तर पंचनामा केला.
२०१५ मध्ये सुरू झालेल्या आणि १०० शहरांचा समावेश असलेल्या 'स्मार्ट सिटी मिशन' योजनेमध्ये महाराष्ट्रातील ८ शहरांची निवड झाली होती. या योजनेसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर झाला, मोठमोठे दावे व जाहिराती झाल्या. मात्र, आज प्रत्यक्षात या शहरांची अवस्था अत्यंत वाईट असून ही शहरे स्मार्ट झाली की आणखीन बिघडली? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.
पहिल्याच पावसात शहरे पाण्यात आणि नेत्यांच्या बॅनरखाली कचरा
विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, "शहरांमध्ये राजकीय नेत्यांचे मोठमोठे बॅनर झळकत असतात, पण दुर्दैवाने त्याच बॅनरच्या खाली कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. पहिल्याच पावसात पुणे, ठाणे आणि मुंबई ही शहरे का तुंबतात? पुण्यात नागरिक अजूनही तासन्तास वाहतूक कोंडीत का अडकतात? नागपूरमधील कोट्यवधींच्या पाणी पुरवठा योजनांवर सतत प्रश्नचिन्ह का उभे राहते? नाशिकमध्ये रस्ते दुरुस्ती आणि पाणी पुरवठा विभागांमध्ये समन्वय का दिसत नाही? तसेच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आजही पाणी आणि कचऱ्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन का करावे लागते?"
केवळ चौकात वाघ-हत्तीचे पुतळे उभे करणे किंवा रंगरंगोटी करणे म्हणजे 'स्मार्ट सिटी' नव्हे, तर खड्डेमुक्त रस्ते, २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी, वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन, प्रदूषणमुक्त वातावरण आणि वाहतूक कोंडीमुक्त दर्जेदार जीवनमान शहरात मिळणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी स्मार्ट सिटीच्या मूळ संकल्पनेची आठवण करून दिली. शहरांमध्ये विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असून एका विभागाने रस्ता डांबरीकरण केल्यानंतर लगेचच दुसरा विभाग तो रस्ता खणतो, या कारभाराचा त्यांनी निषेध केला.
पुलांच्या कामात कोट्यवधींची उधळपट्टी
जयंत पाटील यांनी पुणे आणि मुंबईतील काही पुलांच्या कामातील आर्थिक उधळपट्टी आणि तांत्रिक त्रुटींची उदाहरणे देऊन सरकारला कोंडीत पकडले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मुळा नदीवर बांधलेल्या सांगवी व बोपोडी पुलाचा उल्लेख करत ते म्हणाले, "३२ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला गेला आणि त्याच्या सुशोभीकरणावर तब्बल २० कोटी रुपये फुंकण्यात आले. हे म्हणजे 'चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला' असा प्रकार आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बेताची असताना इतकी उधळपट्टी कशासाठी? एवढा खर्च करूनही आज दुभाजक, जोड रस्ते आणि सेवा रस्त्यांच्या अभावामुळे हा पूल दुहेरी वाहतुकीसाठी बंद आहे, औंधकडे जाणाऱ्या वाहनांची कोणतीही ठोस सोय नाही."
तसेच, मुंबईतील गोरेगाव येथील ७५० मीटर लांबीच्या 'मृणालताई गोरे' पुलाच्या विस्तारीकरणावर २४८ कोटी रुपये खर्च झाले. मात्र, उद्घाटनाच्या अवघ्या काही तासांतच रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क आणि सांधे (Joints) उघडे पडले. यावरून त्यांनी दुष्यंत कुमार यांच्या एका प्रसिद्ध ओळीने सरकारवर निशाना साधला...
"तुम्हारी फाइलों में गाँव का मौसम गुलाबी है, मगर ये आँकडे झूठे हैं और ये दावा किताबी है।"
सांगलीची दुरवस्था आणि केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला विरोध
आपल्या सांगली मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले की, सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यांची बिकट अवस्था आहे, पाण्याचा भीषण तुटवडा जाणवत आहे आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा स्थितीत महापालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले शास्तीकर माफीचे आश्वासन त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी मुंबईतील गेल्या १०० वर्षांपासून अविरत वैद्यकीय सेवा देणाऱ्या ऐतिहासिक 'केईएम' (KEM) हॉस्पिटलचे नाव बदलण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घालू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
Key Points Summary
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्मार्ट सिटी योजनेतील हजारो कोटींच्या कथित गैरव्यवहारावर विधानसभेत उठवले ताशेरे.
केवळ एलईडी दिवे आणि रंगरंगोटीने शहरे स्मार्ट होत नसून, पहिल्याच पावसात मुंबई, पुणे, ठाणे तुंबत असल्याचा आरोप.
पिंपरी-चिंचवड येथील सांगवी-बोपोडी पुलाच्या ३२ कोटींच्या बांधकामावर तब्बल २० कोटींच्या सुशोभीकरणाची उधळपट्टी केल्याचे उघड.
गोरेगावातील २४८ कोटींच्या मृणालताई गोरे पुलाचे उद्घाटनानंतर काही तासांतच निकृष्ट पॅचवर्क उघड झाल्याची टीका.
'तुम्हारी फाइलों में गाँव का मौसम गुलाबी है...' म्हणत शासनाच्या कागदोपत्री दाव्यांवर आणि टेंडर प्रक्रियेच्या गुणवत्तेवर शेरोशायरीतून प्रहार.
सांगलीत रस्त्यांची दुरवस्था, पाणी टंचाई आणि घरपट्टी वाढीला नागरिकांचा असलेला तीव्र विरोध मांडला.
मुंबईतील ऐतिहासिक केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्याच्या हालचालींना जयंत पाटील यांनी दर्शवला तीव्र विरोध.