पुणे (Pune) : पुणे शहरात होणाऱ्या जी २० (G 20) परिषदेसाठी महापालिकेने ठिकठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. मात्र, ही कामे करताना नागरिकांना विश्वासात घेण्यात येत नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कोथरूडमध्ये स्वप्नशिल्प सोसायटीच्या सीमाभिंतीशेजारी रस्त्यावरील पदपथावर भिंत बांधून त्यावर जाहिरातबाजीचा प्रकार नागरिकांनी गुरुवारी रात्री हाणून पाडला. तसेच त्याबाबत आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडेही तक्रार केली.
काय आहे तक्रार
- सोसायटीच्या पश्चिमेकडील भिंतीला चिटकून पदपथ उखडून पदपथावर मोठ्या पक्क्या भिंतीचे व लोखंडी पिलरचे बांधकाम
- रात्री चौकशी केली असता सुशोभीकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले
- मनपाच्या संमतीने एका बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकाम करण्यात येणार असल्याचे समजले
- त्या नव्या भिंतीवर कंपनीचा लोगो लावला जाणार आहे
- येथील रस्त्यावर वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते
- त्यात अशा जाहिरातीच्या भिंती पदपथावर बांधून पादचारी व नागरिकांची अडचण करून महापालिका काय साध्य करीत आहे?
- जाहिरातीसाठी पदपथावर भिंत का बांधली जात आहे?
महापालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही हे काम थांबवले आहे. या कामाला ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. सुशोभीकरणाच्या कामात सर्वांनी सहभागी व्हावे. नागरिकांनी सहकार्य करावे. महापालिकेच्या बांधकाम विभागातील मनपा बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे म्हणाले, सोसायटीतील रहिवाशांनी दिलेल्या पत्रावर वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेवू.
आमचा कोथरूड कनेक्ट म्हणून येथील सोसायट्यांचा गट आहे. आम्ही इथे राहणाऱ्या सभासदांच्या रोजच्या अडचणी लक्षात न घेता व आमच्याशी चर्चा न करता येथील सार्वजनिक जागेवर कुठल्याही वैयक्तिक जाहिरातींना परवानगी देवू नये. आम्ही करोडो रुपयांचा मालमत्ता कर मनपाला भरत असताना अशा बांधकाम व्यावसायिकामार्फत सुशोभीकरणाची गरजच काय. आमच्या सोसायटीच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारचे रंगकाम करू नये, अशी आमची महापालिकेकडे मागणी आहे.
- प्रशांत भोलागीर, सचिव, स्वप्नशिल्प सोसायटी, पुणे