Lake Tendernama
पुणे

Pune : शहरातील 'या' तीन तलावांमधील गाळ काढणार; चार कोटी खर्च करणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज, जांभूळवाडी व पाषाण येथील तलावांमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी महापालिका भर देणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जलसंपदा विभागाच्या मदतीने गाळ काढण्यास सुरुवात केली जाणार आहे. या कामामुळे जलपर्णीवर नियंत्रण येणार आहे, त्याचबरोबर तलावाभोवतीच्या परिसरातील नागरिकांची डासांच्या प्रादुर्भावापासून सुटका होणार आहे.

कात्रज, जांभूळवाडी व पाषाण या तिन्ही तलावांमधील गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. त्याचबरोबर जलपर्णीच्या वाढत्या प्रभावामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने तिन्ही तलावांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात तलावांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

काय करणार?

१) तिन्ही तलावांमधील गाळ काढण्यासाठी चार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार

२) महापालिकेने एक कोटीची आगाऊ रक्कम यांत्रिकी विभागाला दिली

३) यंत्रसामग्री, मनुष्यबळ व कामाचा अनुभव असल्याने संबंधित विभागाला काम

४) १ एप्रिलपासून कामाला सुरुवात. प्रारंभी जांभूळवाडी व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कात्रज तलावातील गाळ काढणार. पावसाळ्यापूर्वीच हे काम केले जाणार

५) त्यानंतर पाषाण तलावाचे काम करणार

कात्रज, जांभूळवाडी व पाषाण येथील तलावातील गाळ काढला जाणार आहे. जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडे हे काम देण्यात आलेले आहे. या कामासाठी त्यांना आगाऊ रक्कमही दिली आहे.

- पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका

शेतीसाठी तलावातील गाळ

तलावांमधील काढलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे महापालिकेने तलावातून काढलेला गाळ शेतीसाठी देण्याचे निश्‍चित केले आहे. शेतकऱ्यांनी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाशी संपर्क साधून गाळ घेऊन जाण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता संतोष तांदळे यांनी केले आहे.

तलावातील गाळ काढण्याचे फायदे

- पाणीसाठवण क्षमता वाढणार

- पावसाळ्यात तलावांमध्ये स्वच्छ पाणी साठणार

- जलपर्णी, डासांचा प्रादुर्भाव कमी होणार

- कूपनलिका, विहिरींमध्ये स्वच्छ पाणी येणार