PM Narendra Modi
PM Narendra Modi Tendernama
पुणे

Pune मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मेट्रोच्या (Pune Metro) विस्तारित मार्गांचे उद्‍घाटन १ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय रेल्वे सुरक्षा मंडळाकडून (CMRS) पाच दिवसांपासून सुरू असलेली तपासणी शनिवारी पूर्ण झाली. त्यामुळे आता रेल्वे, केंद्र सरकार आणि महामेट्रो यांच्यातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली तर, प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मेट्रोच्या गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालया दरम्यानच्या मार्गांची सुरक्षाविषयक तपासणी ‘सीएमआरएस’कडून रखडली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाल्यावर तपासणीला वेग आला. त्यांच्या आठ सदस्यांच्या पथकाकडून १७ जुलै रोजी सुरू झालेली तपासणी २२ जुलै रोजी पूर्ण झाली.

मेट्रो मार्ग, स्थानके प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र महामेट्रोला अल्पावधीत मिळेल. त्यानंतर महामेट्रो राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारशी संपर्क साधेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्‍घाटन होणार आहे.

याबाबत महामेट्रो, राज्याचा नगरविकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले. एक ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यात मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे उद्‍घाटन होणार असल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांकडून आढावा
मेट्रोच्या कामाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी घेतला. ते म्हणाले, ‘‘मेट्रोच्या विस्तारित मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पंतप्रधानांच्या दौऱ्यात मेट्रोचे उद्‍घाटन होईल. त्यासाठीच्या सूचना नगरविकास विभाग, महामेट्रो, महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

सलग प्रवास शक्य
विस्तारित मार्गांमुळे शहराच्या मध्यभागात मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. वनाजपासून नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, महापालिका, पुणे स्टेशनपर्यंत प्रवाशांना सलग प्रवास शक्य होईल तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय हा प्रवासही सलग करता येईल. तसेच, मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना इच्छितस्थळी पोचण्यासाठी पीएमपीने शटल बस सेवेचे नियोजन केले आहे.

या मार्गांचे होणार उद्‍घाटन
- गरवारे कॉलेज ते रूबी हॉल क्लिनिक (अंतर ४. ७ किमी) ः स्थानके १- डेक्कन जिमखाना, २- संभाजी उद्यान, ३- महापालिका भवन, ४- शिवाजीनगर न्यायालय, ५- मंगळवार पेठ (आरटीओ), ६- पुणे रेल्वे स्टेशन व ७- रूबी हॉल क्लिनिक.
- फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय (अंतर ६.९ किमी) ः स्थानके १- दापोडी, २- बोपोडी, ३- खडकी, ४- रेंजहिल्स.
- रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी आणि शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे आणि ११ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. ‘सीएमआरएस’ची तपासणी शनिवारी पूर्ण झाली आहे. त्यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात पुढील टप्प्यांतील मार्गांचे उद्‍घाटन होईल.
- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो