Rajaram Bridge
Rajaram Bridge Tendernama
पुणे

Pune : सिंहगड रोडवासियांनो आता काळजी सोडा! मिळणार आणखी एक पूल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरला (Sinhgad Road To Karve Nagar) जाण्यासाठी मुठा नदीवर (Mutha River) सनसिटी-कर्वेनगर (Suncity To Karve Nagar Bridge) हा पूल नुकताच मंजूर केला आहे. आता पुन्हा म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दोन पुलांच्या मध्ये आणखीन एक पूल मुठा नदीवर बांधला जाणार आहे. नवशा मारुती ते डीपी रस्त्यावर साकेत सोसायटीजवळ हा पूल बांधण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

काम सुरू होईना
सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर, कोथरूडला जोडण्यासाठी मुठा नदीवर वारजे आणि राजाराम पूल आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने सुमारे ३९ कोटी रुपये खर्च करून सनसिटी ते कर्वेनगर हा भाग पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला. भूसंपादनासह सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम करण्याचे आदेशही ठेकेदाराला दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही.

पाच प्रकल्पांसाठी सल्लागार
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल बांधण्याचे सुचविले आहेत. त्यापैकी प्राधान्याने येरवडा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात समतल विलगक किंवा उड्डाणपूल, शिमला ऑफिस चौक, हरे कृष्ण मंदिर पथ आणि आनंद ऋषीजी चौक (पुणे विद्यापीठ) या तीन ठिकाणी भुयारी मार्ग बांधणे आणि नवशा मारुती येथे नदीवर पूल अशा पाच प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा आणि विकास आराखड्यात मुठा नदीवर नवशा मारुती ते पटवर्धन बागेजवळील साकेत सोसायटीजवळ डीपी रस्त्याला जोडणारा पूल प्रस्तावित केला आहे.

दुर्लक्षित पण प्राधान्य
नवशा मारुती ते डीपी रस्ता या पुलाची चर्चा यापूर्वी फारशी झालेली नव्हती. त्याऐवजी सनसिटी-कर्वेनगर या पुलाची चर्चा जास्त झाली होती. मात्र, प्रशासनाने सिंहगड रस्ता व नदीच्या पलीकडील कर्वेनगर, कोथरूडचा भाग जोडण्यासाठी आणखीन एक पूल उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

मेट्रोसाठी पूल सोईचा
१) सिंहगड रस्त्यावरून खडकवासला ते हडपसर-खराडीपर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. त्याचे नवशा मारुतीच्या जवळपास मेट्रोचे स्टेशन असणार आहे. त्यामुळे एरंडवणे, कोथरूड, कर्वेनगर या भागातील नागरिकांना मेट्रोने हडपसर, खराडी भागात जाण्यासाठी स्टेशनसाठी कनेक्टिव्हिटी म्हणून हा पूल सोयीचे ठरणार आहे.


२) सध्या कोथरूड, कर्वेनगर भागातील नागरिकांना स्वारगेटकडे जाण्यासाठी राजाराम पूल किंवा म्हात्रे पूल वापरावा लागतो, पण यासाठी मोठा वळसा घालावा लागतो, त्यादृष्टीने हा पूल उपयुक्त ठरणार आहे. मात्र हा पूल जेथे उतरणार आहे, त्या नवशा मारुती चौक व डीपी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना आवश्‍यक आहे.

नवशा मारुती ते साकेत सोसायटी डीपी रस्ता हा पूल विकास आराखड्यासह सीएमपीमध्ये दाखविण्यात आला आहे. हा पूल झाल्याने राजाराम पूल व म्हात्रे पुलावरील ताण कमी होईल. याच्या तांत्रिक बाबी सल्लागाराचा अहवाल आल्यानंतर प्राप्त होतील.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

हा नवा पूल बांधल्याने सिंहगड रस्त्यावरील व कर्वेनगर, कोथरूड भागातील नागरिकांना नवा पर्यायी रस्ता मिळेल. फक्त तो बांधताना योग्य वाहतूक नियोजन करून बांधावा, त्यामुळे नवी समस्या तयार होऊ नये.
- नितीन मोकाशी, सिंहगड रस्ता

- सिंहगड रस्त्यावरील दैनंदिन वाहनसंख्या : १.२५ लाख

- गर्दीच्यावेळी एका तासात जाणारी वाहने : १४ हजार

- सिंहगड रस्ता, कर्वेनगरमधील लोकसंख्या : ६ लाख