Purandar Airport Tendernama
पुणे

शेतकऱ्यांचा विरोध मावळला; पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन जोरात

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ होणार आहे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Purandar International Airport) : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ९३ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमतिपत्रे सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीन मोजणीला प्रशासनाने शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ५० हेक्टरहून अधिक जमिनींची मोजणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ होणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. भूसंपादनासाठी मुदतीत संमतिपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के विकसित जागेचा मोबदला देण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते.

संपादित करण्यात येणाऱ्या एकूण तीन हजार जागेपैकी अखेरच्या दिवशी सुमारे तीन हजार २२० शेतकऱ्यांनी दोन हजार ८१० एकर म्हणजे ९३ टक्क्यांहून अधिक संमतिपत्रे प्रशासनाकडे दाखल केली. त्यामुळे संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींची प्रशासनाने शुक्रवारपासून जमीन मोजणीस सुरुवात केली.

त्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. त्यामध्ये महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन आणि सर्व शासकीय विभागांतील शेतीअंतर्गत येणाऱ्या विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

त्यानुसार पहिल्याच दिवशी मुंजवडी, खानवडी आणि एखतपूरमधील ५० हेक्टरहून अधिक जमिनींची मोजणी करण्यात आली. पुढील १५ दिवसांत मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोजणी करताना फळझाडे, शेत, विहीर, जलवाहिनी आदींची नोंद घेतली जाणार आहे. मूल्यमापन करताना त्या विचारात घेतल्या जाणार आहेत. स्थानिक शेतकरी आणि बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणीवेळी उपस्थित राहावे. तसेच, त्यांच्या जागेत असणाऱ्या फळझाडांसह मालमत्तेचे माहिती द्यावी. त्यामुळे मूल्यांकन अचूक आणि पारदर्शीपणा होण्यास मदत होईल, असे आवाहनही जिल्हा प्रशासने केले आहे.

ड्रोनची मदत घेणार

विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना निघाल्यानंतर सातही गावांतून मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू होता. तसेच, सुरू असलेल्या मोजणीच्या कामासही स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्याची दखल घेत महसूलमंत्र्यांनी मोजणीस स्थगिती दिली होती. मात्र, भूसंपादनाचे पॅकेज जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विरोध मावळला.

त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जमिनीच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, तिनही गावांतील मोजणी शांततेत झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. गतीने मोजणी पूर्ण करण्यासाठी या पुढील काळात ड्रोनची मदत घेणार असल्याचेही सांगितले.

‘नोकरीची हमी द्यावी’

आम्ही केवळ मोजणीला परवानगी दिली आहे. विमानतळासाठी जर जमीन घ्यायचीच असेल, तर किमान एकराला तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोबदला मिळाला पाहिजे, अशी भूमिका असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, नाइलाजाने मोजणीसाठी तयार झाल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने आम्हाला बेघर किंवा भूमिहीन करू नये, आम्हाला योग्य मोबदला, पुनर्वसनाची हमी आणि स्थानिक तरुणांना नोकरीची संधी दिल्यास पुढचा विचार करू, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

एखतपूर येथील बाधित शेतकरी गंगाराम टिळेकर म्हणाले, ‘‘आमचे नऊ जणांचे कुटुंब असून आम्ही पूर्ण भूमिहीन होणार आहोत. जमिनीच्या बदल्यात जमीन देत पुनर्वसनाची हमी मिळेपर्यंत विरोध कायम राहील.’’