Hoarding Accident Tendernama
पुणे

मोठ्या अपघातानंतरही पुन्हा अनधिकृत होर्डिंगचा वेढा कायम

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : आळंदी-देहू रस्त्यावर डुडुळगाव ते मोशी या सुमारे सहा किलोमीटर अंतरावर होर्डिंगचे तब्बल ४१ सांगाडे उभे आहेत.

जवळपास सर्वच सांगाड्यांवर किमान दोन जाहिरात फलक आहेत. केवळ पाच सांगाडे रिकामे आहेत. गेल्या वर्षी काढलेल्या अनधिकृत होर्डिंगचे सांगाडे एका घरालगत अर्धवट स्थितीत आहे. नऊ जाहिरात फलक जाहिरात कंत्राटदारांचे आहेत.

भोसरी ते पिंपरी चौक

भोसरी ते पिंपरी चौक या रस्त्यावर विविध ठिकाणी इमारतीवर आणि भोसरीमध्ये हॉटेल, एटीएमच्या आवारात मोठाले होर्डिंग उभारले आहेत. लांडेवाडी चौकातील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शेजारीच हॉटेल आहे. वर्दळीच्या ठिकाणी होर्डिंग आहेत. त्यावर बांधकाम व्यावसायिक आणि दागिन्यांच्या जाहिराती केल्या आहेत. तसेच, मासुळकर कॉलनीतही झाडाआड होर्डिंग उभारले असून त्याखाली भाजी स्टॉल, छोटे हॉटेल्स आहेत.

निगडी ते मोरवाडी चौक

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी-मोरवाडीदरम्यान होर्डिंगवर अजूनही भले मोठे फ्लेक्स झळकताना दिसून आले. भक्ती-शक्ती चौकात दोन भव्य होर्डिंग असून त्यावर फ्लेक्सही आहेत. दिवंगत मधुकरराव पवळे उड्डाणपूल परिसरात चार होर्डिंग आहेत. यातील एक मुख्य बस थांब्याजवळ रस्त्यावरच उभारलेला आहे. खंडोबा माळ चौक परिसरातील चारही होर्डिंगवर फ्लेक्स आहेत. यामध्ये दोन अगदी रस्त्यालगत आहेत.

दापोडी ते मोरवाडी चौक

जुन्‍या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते मोरवाडी चौक हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर उभारलेले डिजिटल फलक आणि मोठे बॅनर नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत. हॅरिस पुलाजवळ तीन होर्डिंग आहेत. फुगेवाडी चौकात सीएनजी पंपाजवळ डिजिटल होर्डिंग आहे. यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. वल्लभनगर, खराळवाडी, मोरवाडी चौकातील होर्डिंग धोकादायक आहेत.

निगडी-तळवडे मार्ग

निगडी ते तळवडे मार्गावर गोपीनाथ मुंडे चौक, त्रिवेणी चौक, तळवडे चौक आणि कॅनबे चौकात अनेक धोकादायक होर्डिंग आहेत. मार्गावरील ७० टक्के होर्डिंगवर फ्लेक्स आढळले. महापालिकेला ते काढायचा विसर पडला काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तळवडे चौकातच रस्त्यालगत मोठ्या उंचीवर धोकादायक होर्डिंग आहे. कॅनबे चौक आणि गोपीनाथ मुंडे चौकात नवीन होर्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे.

किवळे ते रावेत

किवळे ते रावेत बीआरटी रस्त्यालगत अनेक होर्डिंग असून त्यावर जाहिराती झळकत आहेत. मुकाई चौकालगत दोन्ही बाजूला होर्डिंग आहेत. संत तुकाराम महाराज पुलाजवळ नॅनो होम सोसायटीसमोरील होर्डिंगवरही फलक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूसही होर्डिंग असून धोकादायक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातही जाहिराती आहेत. गेल्या वर्षी पुलाजवळच होर्डिंग कोसळले होते.

काळेवाडी फाटा-ऑटो क्लस्टर

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी मार्गावर ऑटो क्लस्टरपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेली होर्डिंग्ज नागरिकांच्या जिवासाठी धोक्याची घंटा आहेत. वादळ आणि जोरदार वाऱ्याच्या दिवसांत ही धोकादायक होर्डिंग्ज कोसळण्याची शक्यता आहे. एम्पायर इस्टेट उड्डाण पुलाजवळील नदीपात्रात दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन होर्डिंग आहेत. विजयनगर, नढे कॉर्नर येथे दोन होर्डिंग आहेत.

रावेत ते डांगे चौक

रावेतमधील भोंडवे कॉर्नर ते थेरगावमधील डांगे चौक दरम्यानचे अंतर साधारण पाच किलोमीटर आहे. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ३३ होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत. यातील सर्वच होर्डिंगवर जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये उंचावर असणाऱ्या काहीच जाहिरात फलकांवर हवा जाण्यासाठी खाचा मारण्यात आलेल्या आहेत.