Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

Chandani Chowk Pune : साडेआठशे कोटींचा खर्च करूनही चांदणी चौकाचे रडगाणे संपेना; आणखी 25 कोटींतून...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकात (Chandani Chowk) साडेआठशे कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधल्यानंतरही पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून, त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यात चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग तयार करणे व पादचारी पूल उभारला जाणार आहे. यासाठी किमान २५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

अरुंद पूल आणि महामार्गामुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत होती. त्यासाठी ‘एनएचएआय’, राज्य सरकार आणि महापालिकेतर्फे उड्डाण पूल बांधण्यात आला. त्यामध्ये पुलाचे व महामार्गाचे रुंदीकरण करताना पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत. चांदणी चौकात बावधन, पाषाण, कोथरूड, वारजे या भागांत सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. बस, रिक्षामधून उतरल्यानंतर नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्याचप्रमाणे इच्छित स्थळी जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते.

शिवाय महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उड्डाण पुलासह पादचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी, अशी मागणी यापूर्वीही केली होती. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उड्डाण पुलाचे उद्‍घाटन झाल्यानंतर पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याची टीका झाल्याने ‘एनएचएआय’ आणि महापालिकेचे डोळे उघडले.

महापालिकेने चांदणी चौकाचा अभ्यास करून समस्या आणि सुधारणा यांचा आराखडा तयार केला आहे. पादचारी मार्ग बांधण्यासाठी महापालिकेला सुमारे १५ कोटी, तर पादचारी पूल बांधण्यासाठी ‘एनएचएआय’ला सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

धोकादायक ठिकाणे

- मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘पीव्हीआयटी’ येथे रस्ता ओलांडणे धोकादायक

- मुळशीकडे जाणारे रस्ते एकत्र येतात, तेथे पादचाऱ्यांसाठी सुविधा नसल्याने धोका

- मुळशीकडून येणारा उड्डाण पूल बावधनच्या बाजूला उतरतो, तेथे रिक्षा, बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी

- एनडीए-पाषाण पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार नाही

- एनडीए-पाषाण पुलाच्या खालच्या बाजूला मुंबई व साताऱ्याकडे जाणाऱ्या बस रस्त्यात थांबतात

- बावधनकडून कोथरूडकडे जाण्यासाठी पादचाऱ्यांसाठी सुविधा नाही

- बावधन सर्कल, एनडीए चौकात पादचारी मार्ग नाही

या आहेत उपाययोजना

- चांदणी चौकातील आठ मार्ग, त्यांच्या परिसरातील रस्त्यावर पादचारी मार्ग बांधणे

- महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल आवश्‍यक

- पादचारी पुलावर चढण्या-उतरण्यासाठी चार ठिकाणी जिने

- बावधन ते कोथरूडदरम्यान महामार्गाला समांतर पादचारी पूल

- सातारा, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बससाठी बसथांब्याची सोय

- पादचारी पूल व नियोजित शिवसृष्टी एकमेकांशी जोडले जाणार

- वेद भवनाजवळ पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा

- चांदणी चौक परिसरात चार किलोमीटरचे पादचारी मार्ग आवश्‍यक

पादचारी पुलासाठी बैठक

पादचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण करताना ‘एनएचएआय’ आणि महापालिकेत समन्वय आवश्‍यक आहे. पादचारी पूल उभारला जाईल, असे यापूर्वी ‘एनएचएआय’ने स्पष्ट केले आहे, पण त्याचा खर्च किती असेल? हे अद्याप स्पष्ट नाही. या संदर्भात महापालिका व ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे.

चांदणी चौकातील पादचाऱ्यांच्या समस्येसंदर्भात महापालिकेने अभ्यास केला आहे. यामध्ये चार किलोमीटर लांबीचे पादचारी मार्ग, त्यांना जोडणारा व महामार्ग ओलांडता येईल, असा पादचारी पूल प्रस्तावित केला आहे. पादचारी मार्ग वगळता इतर कामासाठी किमान १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

- निखिल मिजार, वाहतूक नियोजन सल्लागार, महापालिका