Railway Track
Railway Track Tendernama
पुणे

प्राणी, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी मोठा निर्णय; 42 हजार कोटी..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रेल्वे बोर्ड देशातील महत्त्वाच्या सेक्शनमध्ये रुळांच्या बाजूने अँटी क्रॅश बॅरिअर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ४२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे विभागात लोणावळा ते दौंड १३९ किमी सेक्शनमध्ये रुळांच्या बाजूने अँटी क्रॅश बॅरिअर बसविले जाणार आहे. शिवाय पादचारी व प्राण्यांसाठी रुळाच्या खालून सुमारे ८ फूट उंचीचा भुयारी मार्गही तयार केला जाणार आहे. यातून पादचाऱ्यांनाही जाता येणार आहे. यासाठी पुणे विभागाला २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने पहिल्यादांच प्राण्यांच्या सुरक्षेला पर्यायाने प्रवासी सुरक्षेला महत्त्व देत रुळांच्या खाली आठ फूट लांबी व रुंदीचा सबवे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागाकडून अशा ठिकाणांचा सध्या शोध सुरू आहे.

यामुळे रूळ ओलांडण्याच्या नादात धावत्या रेल्वे खाली येऊन मृत्यू पावणाऱ्या नागरिकांचे, गाई, म्हशी यांचे प्रमाण कमी होईल. प्राथमिक माहितीनुसार कामशेत, दापोडी व लोणी येथे अशा सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

पहिल्यादांच बॅरिअरचा वापर

राष्ट्रीय महामार्गावर बहुतांश ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेसाठी अँटी क्रश बॅरिअरचा वापर होतो. आता पहिल्यादांच रुळाच्या बाजूने देखील रुळांच्या सुरक्षेसाठी अँटी क्रश बॅरिअर बसविले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या मार्गात कोणताही अडथळा येणार आहे. तसेच पादचाऱ्यांना व प्राण्यांनाही सुरक्षितपणे रूळ ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावे लागणार नाही.

याचा फायदा काय?

- लोणावळा ते दौंड या मार्गावर रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावतील

- हा वेग कायम राहून त्यात अडथळा येणार नाही

- गाड्यांना होणारा उशीर टाळणार

दृष्टिक्षेपात

लोणावळा ते दौंड - १३९ किमी अँटी क्रॅश बॅरिअर

देशभरात बॅरिअर बसविण्यासाठी खर्च - ४२ हजार कोटी रुपये

पुणे विभागाला मिळालेला निधी - २१४ कोटी रुपये

रेल्वे प्रशासन रुळांच्या बाजूने अँटी क्रश बॅरिअरचा वापर करीत आहे. तसेच ज्या ठिकाणी प्राणी अथवा पादचारी रूळ ओलांडताना अपघाताच्या जास्त घटना घडल्या आहेत. असे ठिकाणे शोधून त्या ठिकाणी आठ फूट लांबी व रुंदीचे भुयारी मार्ग तयार केले जातील. यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल.

- डॉ. रामदास भिसे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे