पुणे (Pune) : पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणाऱ्या बालेवाडी ते वाकड या आणखी एका पुलासाठी दोन्ही महापालिकांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. चार वर्षांपूर्वी पूल तयारही झाला. मात्र, पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक अवघी २०० मीटर जागा खासगी जागा मालकांकडून पुणे महापालिकेला मिळेनाशी झाली आहे. वारंवार बोलणी, बैठका घेऊनही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे या पुलावरून अद्याप एकही वाहन गेलेले नाही. त्यामुळे दोन्ही शहरांमधील लाखो वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
बालेवाडी, बाणेर भागातील नागरिकांना पिंपरी - चिंचवडमध्ये जाण्यासाठी आणि वाकड, हिंजवडी, रहाटणी, काळेवाडी येथील नागरीकांना बाणेर, बालेवाडीला ये-जा करणे सोईस्कर व्हावे, यासाठी पुणे व पिंपरी - चिंचवड या दोन्ही महापालिकांनी कस्पटे चौक ते बालेवाडी या दरम्यान मुळा नदीवर पूल बांधला. जून २०१३ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली, अनेक अडथळे पार करत अखेर ऑगस्ट २०२१ मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले. त्यास तीन ते चार वर्षे झाली, मात्र पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या अभावामुळे पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. स्थानिक नागरिकांच्या जनहित याचिकेनंतर न्यायालयाने महापालिका प्रशासनाचे कान टोचले, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुलाला जोडणारा रस्ता कस्पटे चौकात तयार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत बालेवाडीमध्ये ममता चौक ते एफ रेसीडेन्सी या दरम्यान ४०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र पुलाजवळच खासगी मालकीची २०० मीटर जागा आहे, त्यांच्याकडून जागा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न आणखीच किचकट झालेला आहे.
पुलाचे काम दृष्टीक्षेपात
- पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात - २०१३
- जुलै २०१७ पर्यंत पुलाचे काम पूर्ण - ७० टक्के
- अनेक अडथळे पार करत अखेर पुलाचे काम पूर्ण - २०२१
- पुलाची एकूण लांबी - १७५ मीटर
- पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकेने पुलासाठी केलेला खर्च - २५ कोटी १८ लाख रुपये
- पुलामुळे नागरीकांना होणारा फायदा - आठ किलोमीटरचा वळसा टळणार
पुलाच्या कामास विलंब होण्याची कारणे
- जोडरस्त्यासाठी जागांचा ताबा लवकर मिळाला नाही
- प्रारंभी जादा दराच्या निविदा आल्याने पिंपरी - चिंचवड महापालिकेला निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली
- पहिल्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडले
- दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला
सध्या काय परिस्थिती?
पुलावरील वाहतूक सुरू न झाल्याने नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे महामार्गावरही वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्याचबरोबर अनेकदा भरधाव अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा फटका नागरिकांना बसलेला आहे. आता नागरिकांचा जीव गेल्यावर पूल सुरू होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कस्पटे वस्ती ते बालेवाडी पुलास जोडण्यासाठी आवश्यक २०० मीटर जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. त्यामुळे जोड रस्त्याचे काम झालेले नाही. संबंधित जागा मालकांशी आयुक्तांच्या पातळीवर बैठक घेतल्या आहेत. जागा मालकांना विनंतीपत्र पाठविले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
- सुधीर चव्हाण, प्रभारी मुख्य अभियंता, स्मार्ट सिटी
बालेवाडीतून हिंजवडीला जाण्यासाठी दररोज महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आठ किलोमीटरचा वळसा आम्हाला पडतो. महापालिकेने कस्पटे वस्ती चौकातील पूल लवकर सुरू करावा.
- अजिंक्य भोसले, संगणक अभियंता