Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMP Tendernama
पुणे

Pune: बकोरियांचा मोठा निर्णय; PMPची गती वाढणार कारण प्रत्येक डेपोत

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपी (PMP) प्रशासनाने सर्वच डेपोंमध्ये ई-चार्जर (E Charger) व सीएनजी (CNG) पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी विविध डेपोंमध्ये जाऊन जागेची पाहणी करीत आहेत. सीएनजी पंप व चार्जरची सुविधा मिळाल्याने अन्य डेपोंमध्ये होणाऱ्या पीएमपीच्या फेऱ्या वाचतील. परिणामी प्रवासी फेऱ्या रद्द होणे, विलंब होणे आदी प्रकार घडणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

‘सीएनजी’ भरण्याची वेळ ठरविली

पीएमपीच्या ताफ्यात सर्वाधिक बस या सीएनजीवर धावतात. प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने पीएमपीमध्ये ‘सीएनजी’ भरण्याची वेळ ठरविली आहे. यात दुपारी व रात्री शिफ्ट संपल्यावर सीएनजी भरणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही चालक अनेकदा सीएनजीचा प्रेशर कमी असल्याचे सांगून पूर्ण सीएनजी न भरताच डेपोच्या बाहेर पडतात.

परिणामी, सीएनजीअभावी पीएमपी मध्येच बंद पडतात. तर काही वेळा चालक मार्गात पीएमपी बंद पडू नये म्हणून पुन्हा सीएनजी भरण्यासाठी डेपोत जातात. यात प्रवाशांनाचा वेळ जातो.

पीएमपी चार्जिंगसाठी चार तास

सध्या पाच डेपोंमध्ये सीएनजीचे पंप आहेत. सर्वच डेपोत पंप उभारले गेल्याने कोणत्याही डेपोत सीएनजी भरता येईल. एकाच वेळी सीएनजी भरण्यासाठी होणारी गर्दी देखील टळेल. हीच परिस्थिती ई-बसच्या बाबतीत आहे. पीएमपी चार्ज होण्यासाठी किमान साडेतीन ते चार तास लागतात. त्यामुळे अनेक चालक बसचे पूर्ण चार्जिंग न करताच बाहेर पडतात. त्यामुळे मध्येच चार्जिंग कमी होऊन बस बंद पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे देखील आता टळेल.

पीएमपीच्या १५ डेपोंपैकी दोन डेपो ग्रामीण भागात येतात, तेव्हा ग्रामीण भागात सीएनजीचा पुरवठा करण्यासाठी ‘टोरांटो’शी चर्चा सुरु आहे. तर शहरी भागात ‘एमएनजीएल’शी चर्चा सुरू आहे.

पीएमपीच्या सर्वच डेपोंमध्ये ई-बस व सीएनजी बससाठी आवश्यक असलेली सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी सुरू आहे. याशिवाय, अन्य संस्थांशी चर्चा सुरू आहे.

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

पीएमपीची सद्यःस्थिती

१८१४ - एकूण बस संख्या

१७५० - रस्त्यावर धावणाऱ्या बस

७९१ - सीएनजीवर धावणाऱ्या स्वः मालकीच्या बस

कोथरूड, न. ता. वाडी, हडपसर, कात्रज व पिंपरी - सीएनजी डेपो

८७ हजार किलो - सीएनजीचा दररोजचा वापर