MSRTC: एसटी प्रवाशांसाठी चांगली बातमी; 'ही' सेवा पुन्हा सुरू होणार

MSRTC
MSRTCTendernama

पुणे (Pune) : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात मार्च २०२३ अखेर २०० ‘हिरकणी’ बसगाड्या दाखल होत आहेत. दापोडी येथील कार्यशाळेत त्याचे काम सुरू झाले असून, त्यापैकी एक बस पूर्ण होऊन तिची आरटीओमध्ये नोंदणीही झाली आहे. यामध्ये ४३ आसनी प्रवासी क्षमता असून, प्रवाशांच्या सोयीसाठी पुशबॅकचीही सोय केली आहे. तथापि, कोणत्या विभागाला किती गाड्या मिळतील, हे अद्याप ठरलेले नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पूर्वी ४०० हिरकणी बस होत्या. मात्र काही बसचे आयुर्मान संपले. त्यानंतर एसटी महामंडळाने नव्या हिरकणी बस घेण्याचा निर्णय घेतला. हिरकणी पूर्ण क्षमतेने दाखल झाल्यास ‘रातराणी’ची सेवादेखील पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

हिरकणीचा प्रवास

राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुकीत पहिल्यांदा १९८२ साली हिरकणी बसचा वापर केला. प्रवाशांना ही बस आवडली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लालपरी सोबत हिरकणीची संख्या वाढू लागली. काही महत्त्वाच्या मार्गांवर रात्रीच्या प्रवासासाठी या गाड्या ‘रातराणी’ म्हणून धावण्यास सुरुवात झाली.

खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे एसटी महामंडळाने वातानुकूलित शिवनेरी, शिवशाही आसन आणि शयनयान, अश्वमेध, मिडी यशवंती सेवेत आणल्या. त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक ‘शिवाई’ ही बस २०२२ मध्ये दाखल झाली. दरम्यानच्या काळात हिरकणी बसची संख्या कमी करण्यात आली.

बस संख्या वाढविण्याचे प्रयत्न

सध्या एसटी महामंडळात बसगाड्यांची संख्या कमी झाली आहे. सुमारे ६ हजार गाड्यांची संख्या घटल्याने त्याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात हिरकणी, सीएनजीवर धावणाऱ्या बस, ई-बसचादेखील समावेश आहे. येत्या काही दिवसांत बसच्या संख्येत वाढ होईल.

‘हिरकणी’च्या एका बसची निर्मिती होऊन त्याची आरटीओमध्ये नोंदणीही झाली आहे. ज्या प्रमाणात ‘हिरकणी’ बस तयार होतील त्या प्रमाणात विविध विभागांना त्या दिल्या जाणार आहेत. नव्या बसमध्ये काही बदल केले आहेत. त्याचा प्रवाशांना निश्चितच फायदा होईल.

- शिवाजी जगताप, सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com