Ajit Pawar Tendernama
पुणे

Ajit Pawar : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाबाबत काय दिले उपमुख्यमंत्र्यांनी आदेश?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले पाहिजे. रस्ते जास्तीत जास्त रुंद करा. पुरंदर येथील विमानतळाच्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सुरवात करा. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी सेंद्रिय कचऱ्यातून गॅसनिर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत कार्यवाही करावी,’’ अशा विविध सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्या.

तसेच, तळेगाव येथे ‘टूल हब’साठी ३०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेची नुकतीच आढावा बैठक झाली. त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, मैत्री संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हा विकास आराखड्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर, पर्यावरण व परिपूरक अर्थव्यवस्था, उद्योग क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी विविध संस्थाकडून आढावा घेण्यात आला.

पवार म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. राज्यात जलद आणि सर्वसमावेशक विकासासाठी, खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे काम करणाऱ्या मैत्री संस्थेवर राज्यातील महत्त्वाच्या शहरातील विविध विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी दिली आहे.