Ajit Pawar
Ajit Pawar Tendernama
पुणे

Ajit Pawar : दादा ॲक्शन मोडमध्ये; खडकवासल्यातून असे नेणार पाणी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी घेऊन जाण्याचा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेऊन त्यासाठी आवश्‍यक निधी कसा उपलब्ध करून देता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला धरण ते फुरसुंगी असा २८ किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी टेंडर काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून त्याची छाननी होऊन तो तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला. या समितीने प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर राज्य शासनाकडे तो अंतिम मान्यतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांची नुकतीच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झाली. या बैठकीत त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. यासाठी सुमारे २ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधी कसा उपलब्ध करता येईल, यावर चर्चा झाली. वित्त विभागाशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे पवार यांनी या वेळी सांगितले.

या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कालव्याच्या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. सध्या ही जागा ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरीत करावी, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. तसेच यातून जलसंपदा विभागाला अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) मिळेल किंवा कसे, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आले. प्रस्तावाला पवार यांनीदेखील अनुकूलता दर्शविली आहे. निधीबाबत वित्त विभागाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

- ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग