Traffic Jam
Traffic Jam Tendernama
पुणे

पोलिसांचा कारवाईचा दणका; पुण्यातील कोंडी फोडण्यासाठी मोठे पाऊल...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहराच्या (Pune City Traffic) मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्त्यांवर दररोज ऐन रहदारीच्यावेळी येणाऱ्या अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी ‘ब्रेक’ लावला आहे. वाहतूक कोंडीला काही प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या एक हजार ८०० वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा दंड वसूल केला आहे. यामुळे अवजड वाहनांच्या मुक्तसंचाराला लगाम लागला आहे.

शहरात मागील वर्षभरापासून काँक्रिट मिक्‍सर, मालवाहू ट्रक, डंपर, खासगी बस अशी अवजड वाहने ऐन गर्दीच्या रस्त्यांवरून भरधाव ये-जा करताना दिसतात. विशेषतः कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर ही वाहतूक सुरू असते. अवजड वाहनांमुळे मागील दहा महिन्यांत ८३ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती मांडली होती.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली, तसेच नव्याने नियुक्त झालेल्या वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनीही अवजड वाहनांवर कारवाई करण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार, २१ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. चतुःशृंगी, डेक्कन, वारजे, खडकी, येरवडा, सिंहगड रस्ता अशा वाहतूक शाखेच्या विविध विभागांमध्ये रहदारीच्यावेळी शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. २१ नोव्हेंबरपासून आतापर्यंत सुमारे एक हजार ८०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १३ लाख २९ हजार ८०० रुपयांचा दंडदेखील वसूल केला.

कायदा काय सांगतो?
साडेसात हजार किलोपेक्षा जास्त वजन असणारी वाहने ही जड वाहने म्हणून संबोधली जातात. अशा जड, अवजड वाहनांना निर्धारित वेळेतच प्रवेश देण्यात येतो, त्याव्यतिरिक्त शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी पोलिसांना दिल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.

सकारात्मक परिणाम
- रहदारीच्यावेळी होणारी कोंडी कमी होण्यास मदत
- कोंडी काही प्रमाणात फुटल्याने नागरिकांच्या वेळेची बचत
- अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण
- कोंडी फोडण्याचा पोलिसांवरील ताणही झाला कमी

अवजड वाहनांवर कारवाई केल्यानंतर ४० टक्के वाहनांचा शहरातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे कोंडी फुटण्यापासून ते अपघातांवर हळूहळू नियंत्रण येऊ लागले आहे. ही कारवाई पुढेही सुरुच राहील.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक विभाग