नातेपुते (Natepute) : सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याला सर्वस्वी बांधकाम खाते, या खात्यातील अधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत. या सर्वांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड. संदीप वाघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्र शाळेची संपूर्ण इमारत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गामध्ये पाडावी लागली. धर्मपुरी जिल्हा परिषद शाळेसाठी १९ गुंठे जागेत इमारत व खुले मैदान होते. त्यापैकी पालखी महामार्गात दहा गुंठे जागा बाधित झाली आहे. शिल्लक नऊ गुंठे जागेत गावातील काहींनी अतिक्रमणे केली आहेत. यासाठी शासनाकडून इमारतीच्या नुकसान भरपाईपोटी ५४ लाख रुपये मिळाले आहेत आणि जागेसाठी ८३ लाख रुपये आलेले आहेत.
या ठिकाणी समूह साधन केंद्र, केंद्र प्रमुखांसाठी कार्यालय एक खोली, शिक्षकांसाठी नऊ खोल्या अशा दहा खोल्यांची गरज आहे. तसेच शाळेला वॉल कंपाउंड, मुला- मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पाण्याची टाकी आदींची गरज असताना शासनाकडून आलेल्या पैशातून एक एकर जागेची खरेदी झाली आहे. यासाठी ६१ लाख खर्च झाले आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सर्व प्रक्रिया करण्यासाठी दोन वर्षे वाया घालवली. सात खोल्यांचे टेंडर मंजूर झाले आहे. हे टेंडर सांगोला येथील ठेकेदारास मिळाले आहे. यासाठी ७७ लाख रुपये मंजूर आहेत. सात महिन्यांपूर्वी सुधारित डिझाइननुसार सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते १७ मे २०२४ रोजी भूमिपूजन झाले.
मागील सात महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने किंवा त्याच्या उपठेकेदाराने अद्यापही काम सुरू केलेले नाही. त्यामुळे सव्वाशे वर्षांपूर्वीची, अडीचशे पटसंख्या असणारी ही शाळा आज दीडशे विद्यार्थी संख्येवर येऊन ठेपली आहे.
सहा पत्र्यांच्या खोल्यांत सात वर्ग भरतात. यामध्ये शालेय पोषण आहाराचा माल, केंद्र प्रमुखांचे कार्यालय, मुख्याध्यापकाचे कार्यालय याचाही पत्ता नाही. मुला- मुलींसाठी व शिक्षकांसाठी स्वच्छतागृह नाही. पावसाळ्यात व उन्हाळ्यात पत्र्याच्या खोल्यांमुळे सर्वांना त्रास होत आहे. अशी बिकट परिस्थिती मागील साडेतीन- चार वर्षांपासून आहे. पत्र्याच्या खोल्यांमुळे विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत.
का सोडताहेत विद्यार्थी शाळा?
- जिल्हा नियोजन निधीमधून तीन खोल्या, शाळेसाठी कंपाउंड, स्वच्छतागृह यासाठी निधी मिळावा अशी मागणी करूनही चार मुख्याधिकारी व चार शिक्षणाधिकारी होऊन गेले तरी पूर्तता नाही.
- माळशिरस तालुक्यातील जाधव वस्ती (धर्मपुरी), धर्मपुरी केंद्र शाळा या दोन शाळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गात बाधित झाल्या आहेत. तसेच सावंत वस्ती, दसूर येथील शाळा जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्गात बाधित झाली आहे. एकूण तीन शाळा बाधित झाल्या असून, त्यापैकी जाधव वस्ती धर्मपुरी व सावंत वस्ती दसूर या ठिकाणच्या नवीन शाळांचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, धर्मपुरी येथील केंद्र शाळेचे काम बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे रखडलेले आहे.
- एकूणच परिस्थिती पाहता, विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत, अशी भावना येथील प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे यांनी व्यक्त केली.
संबंधित ठेकेदार हा काम सुरू करीत नाही. याबाबत मुख्याधिकारी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी माळशिरस व इतर संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा समक्ष भेटून, लेखी पत्र देऊन, उपोषणाचे पत्र देऊनही संबंधित ठेकेदार काम सुरू करीत नाही किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग ठेकेदार बदलून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवत नाही. त्यामुळे शाळेपासून मुले वंचित राहात आहेत. ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला सर्वस्वी बांधकाम खाते जबाबदार आहे.
- नितीन निगडे, उपसरपंच, धर्मपुरी