Ujani Dam Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : सिव्हेज ट्रीटमेंट प्लँटच्या उपयोगितेबाबत कोणी उपस्थित केली शंका?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : माघ वारीच्या दरम्यान चंद्रभागा नदीतील पाण्याची दर तीन तासांनी तपासणी करण्याची गरज आहे. पंढरपूर परिसरातील नदीपात्राच्या महत्त्वाची ठिकाणे निश्चित करून तेथील जलप्रदूषणाच्या स्थितीचे निरीक्षण सातत्याने करणे आवश्यक आहे. कारण, लाखो वारकरी चंद्रभागेतील पाणी तीर्थ म्हणून घरी नेत असतात. हे पाणी पिण्यायोग्य नसेल तर त्यांना तत्काळ सूचना देणे गरजेचे आहे.

राज्याचे निवृत्त जलसंपदा सचिव राजेंद्र पवार यांनी नाशिक कुंभमेळ्यादरम्यान असा प्रयोग केला होता. त्यामुळे गोदावरी जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले होते. यासंदर्भात आणि एकूणच भीमा नदी व उजनी धरण जलप्रदूषणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवडचे प्रदूषित पाणी उजनी धरणात जमा होते, पण ते बॅक वॉटरमध्ये समाविष्ट होते. धरणाच्या भिंतीजवळ ते पोचत नाही. तीर्थक्षेत्री मोठ्या संख्येने भाविक जमा होतात, तेव्हा नदीच्या जलप्रदूषणाबाबत खबरदारी घ्यावी लागते. नाशिक कुंभमेळ्यावेळी आम्ही दर तीन तासांचे रिपोर्ट तयार केले होते. कोणत्या कारणामुळे पाणी प्रदूषित होते, त्यानुसार उपाययोजना कराव्या लागतात.’’

‘सिव्हेज ट्रीटमेंट प्लँट’च्या माध्यमातून जलशुद्धीचे काम केले जाते, पण या प्रक्रियेतून निघणारे दूषित पाणी पुन्हा नदीपात्रातच सोडले जाते, त्यामुळे अशा ‘एसटीपी’चा उपयोग कितपत होतो, हे तपासावे लागेल. हे पाणी शेतीसाठी देणे योग्य आहे का, याविषयी शास्त्रशुद्ध तपासणी करावी लागणार आहे. वास्तविक, नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत दूषित किंवा घातक रासायनिक पाणी येता कामा नये, हे पाहणे गरजेचे आहे.

प्रदूषित जलपर्यटनाचा ‘टूरिस्ट’ना त्रास

उजनी धरणातील प्रदूषित पाण्यात जलपर्यटन केल्यास त्याचा पर्यटकांनाही त्रास होणार, यात शंका नाही. शिवाय पाण्याभोवतालच्या ‘रिसॉर्ट’ आणि तत्सम योजनांमुळे जलाशयातील पाणी आणखी घाण होणार. अशा प्रकारचा अनुभव पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाभोवतालच्या रिसॉर्टमुळे आला आहे. त्या प्रकारामुळे पुण्यात जलप्रदूषण झाल्याचे पवार यांनी सांगितले.

खडकवासला किंवा अन्य ठिकाणाहून नदीपात्रात सांडपाणी सोडायचे नाही, असे कडक नियम आम्ही केले होते, मात्र उजनी धरण परिसरामध्ये अशा प्रकारचे नियंत्रण करता येणे थोडे अवघड आहे. कारण, तो परिसर खूप मोठा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘उजनी’च्या खालच्या बाजूस जलपर्यटन शक्य

उजनी धरणाच्या खालच्या बाजूला (डाऊनस्ट्रीम) वॉटरपार्क आणि तत्सम टुरिझमसाठी सुमारे १२५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी जलपर्यटन विकसित केल्यास कोणाचा आक्षेप येण्याचे कारण नाही. तिथे टुरिझम विकसित करण्यासाठी आम्ही टेंडर मागवल्या होत्या. त्या जागा खासगी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देऊन त्याच्या वार्षिक उत्पन्नातून धरणाच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागवण्याचे नियोजन होते, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.