.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर (Solapur) : विमानसेवेसाठी सज्ज झालेल्या होटगी रोड विमानतळावरील विमानाच्या इंधनाचा प्रश्न मागी लागला आहे. (Hotgi Road Airport Solapur)
या ठिकाणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे रिफ्युल सेंटर उभारणी होईपर्यंत याच कंपनीला ब्राऊझरसाठी मान्यता मिळाली आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी असलेल्या प्रमुख अडथळ्यातील ब्राऊझरची परवानगी मिळाल्याने विमानसेवेचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.
सोलापुरातून मुंबई व तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी होती आहे. सोलापूर ते मुंबई या विमानसेवेसाठी नागरी विमान महासंचालनालयाने ३१ जानेवारी रोजी विमानसेवेसाठी टेंडर प्रसिद्ध केली आहे.
ही प्रक्रिया मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. गोवा ते सोलापूर या विमानसेवेसाठी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. इंधनाचा प्रश्न सुटला आहे, सोलापूर ते गोवा, गोवा ते सोलापूर, अशी विमानसेवा आता तत्काळ सुरू होऊ शकते.
सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर या विमानसेवेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूर विमानतळावरून ७२ आसनी विमानाचे उड्डाण होणार आहे. सोलापुरातून उडणाऱ्या ७२ आसनी विमानात ५५ ते ६० प्रवासी बसू शकणार आहे.
होटगी रोड विमानतळावरील धावपट्टी पूर्ण वापरण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जुनी चिमणी आडवी येत असल्याने कमी धावपट्टी वापरून ५५ ते ६० प्रवासी घेऊन विमान उड्डाण करू शकते किंवा उतरू शकते.
विमानसेवेबाबत आतापर्यंत फक्त चर्चाच झाल्याने, सोलापूरची विमानसेवा नक्की कधी सुरू होणार?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.