Solapur Airport Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur: पुणे, मुंबई विमानसेवेचा प्रश्न कधी मार्गी लागणार?

सोलापूर शहराच्या प्रश्नांवर काय म्हणाले आमदार विजयकुमार देशमुख?

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी समांतर जलवाहिनी, आयटी पार्कसह औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मुंबई, पुणे विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये साधारणः तीन हजार कोटींच्या विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून, यातील दोन हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. भविष्यात शहरातील दोन उड्डाणपूल, बसस्थानकाचे विस्तारीकरण अशी ११०० कोटी रुपयांची काम अजेंड्यावर असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

शहरांतर्गत दोन उड्डाणपूल, महापालिकेची सार्वजनिक प्रवासी सेवा सुधारण्यासाठी १०० ई-बस, शहरातील पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ९०० कोटींचा प्रस्ताव, मलनिस्सारण योजना, स्मार्ट सिटी योजना, बसस्थानकाचे विस्तारीकरण आदी विकासकामांमधून शहरातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १२०० बांधकाम कामगारांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. तसेच मतदारसंघातील ८० टक्के मूलभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचेही आमदार देशमुख म्हणाले.

पुढील पाच वर्षांतील अजेंड्यावरील विषय
- अटल आवास योजनेंतर्गत उर्वरित ४ हजार कामगारांना सदनिका देणार
- बसस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा
- श्री महात्मा बसवेश्वर स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा
- टेंडर प्रक्रियेत असलेले रूपाभवानी मंदिर परिसरातील १० कोटींचे यात्री निवासाचे काम पूर्ण करणे
- मंजूर झालेला जुना पूना नाका, वसंत विहारला जाणारा १२ कोटींचा मुळेगाव रस्ता पूर्ण करणार