
अहिल्यानगर (Ahilyanagar): प्रवरानदीवरील येथील समांतर पुलाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करून प्राधान्याने नवीन पूल बांधला, तरच कोल्हारमधील (ता. राहाता) सातत्याने होणारी वाहतुकीची समस्या कमी होईल. अहिल्यानगर (विळद बायपास) ते सावळेविहीर या सुमारे ७० किलोमीटरच्या रस्त्याच्या सुधारित ५१५ कोटींच्या टेंडरनुसार रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल; परंतु टेंडरमधील अंतर्भूत कामांपैकी आधी पूल बांधणे गरजेचे आहे. रस्त्याने वारंवार अनेक ठेकेदार पाहिले. तो पूर्वानुभव पाहता त्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे.
पूर्वीचा समांतर उंच पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरविल्यामुळे तो १९ एप्रिल २०२२ मध्ये पाडला होता. त्याआधी ५ जुलै २०१८ पासून तोच पूल अवजड व हलक्या वाहतुकीला पूर्णपणे बंद केला होता. वास्तविक तो पूल हलकी वाहने व दुचाकीसाठी उपयोगाचा होता. सध्याच्या पुलावरील वाहतुकीचा भारही समांतर पुलामुळे कमी होत असायचा. दोन्ही पुलांवरून एकेरीच वाहतूक होत असायची; परंतु तो पूल पाडल्यामुळे एकाच पुलावर दुहेरी वाहतूक सुरू झाली आणि वाहतुकीची जटिल समस्या उभी राहिली आहे.
राष्ट्रीय मार्ग २० वर्षांपासून खराब झाला आहे. १९९० मध्ये एका कंपनीने रस्त्याचे काम केले होते. त्यानंतर रस्त्याला लागलेली घरघर अद्यापही थांबलेली नाही. २०२१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता काढून तो राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. परंतु, पाच वर्षात प्राधिकरणाला काम पूर्ण करता आले नाही.
प्रचलित बांधकाम दरात वाढ होऊनही पहिल्या ठेकेदाराने २७ टक्के व नंतरच्या ठेकेदाराने ३८ टक्के बिलो टेंडर भरल्या होत्या. चार वर्षात त्या दोघांनीही अर्धवट काम सोडून दिले. आता, तिसऱ्याने २५ टक्के बिलो प्रमाणे काम घेतले आहे. त्याने ५१५ कोटींच्या कामाच्या टेंडर स्वीकारल्या. त्यानुसार २९ एप्रिल २०२५ मध्ये रस्त्याचा कार्यारंभ आदेश निघाला. त्यानंतर चार महिन्यात रस्त्याचे काम संथगतीने सुरू झाले आहे.
मध्यंतरी बुजवलेले खड्डे पुन्हा पडले असून, जागोजागी रस्त्याची चाळण झाली आहे. पूर्वीच्या ठेकेदारांनी फक्त रस्त्याच्या कामाकडे अधिक लक्ष दिले होते. पुलाचे काम प्रत्यक्ष बंद आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक धनेश स्वामी यांच्याकडे या रस्त्याची विशेष जबाबदारी दिली आहे.
नितीन गडकरींची उद्विग्नता
अहिल्यानगर ते सावळेविहीर महामार्गाची टेंडर प्रक्रिया चौथ्यांदा पूर्ण झाली आहे. या महामार्गाचे काम सुरू होईलच असा विश्वास व्यक्त करतानाच रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाला मला बोलावू नका, कारण मला लाज वाटते, असे म्हणत ठेकेदार का टिकत नाही, असा उद्विग्न सवाल मंत्री गडकरी यांनी नुकताच लोणी येथील एका कार्यक्रमाप्रसंगी केला होता.