भिवंडी वाडा महामार्गावर विक्रमी 15 फूट लांबीचा खड्डा

वरिष्ठ अभियंत्याच्या नेतृत्वाखाली ‘टास्क फोर्स’ नेमा; आमदार रईस शेख यांची मागणी
Pothole (File)
Pothole (File)Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : भिवंडी वाडा महामार्गावर (Bhiwandi Wada Highway) १५ फूट लांब आणि १ फूट खोलीचे हजारो खड्डे आहेत. अशीच स्थिती भिवंडीतील बहुतांश रस्त्यांची आहे. भिवंडीतील रस्त्यावरच्या या खड्ड्यांवर उपाययोजना करणे आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांना प्रतिबंध करण्यासंदर्भात ज्येष्ठ अभियंत्याच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स नेमण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख (Rais Shekh) यांनी केली आहे.

Pothole (File)
ऑरिक एमआयडीसीबाबत आली गुड न्यूज; नवीन भूखंड वाटपास...

आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासदंर्भात पत्र लिहिले आहे. यासदंर्भात माहिती देताना आमदार शेख म्हणाले की, भिवंडी वाडा महामार्गावर १५ फूट लांब आणि १ फूट खोलीचे हजारो खड्डे आहेत. अशीच स्थिती भिवंडीतील बहुतांश रस्त्यांची आहे. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सिराज रुग्णालयासमोर डॉ. नसीम अन्सारी हे स्कुटी वनजारीपट्टी नाका येथे ट्रेलरखाली येऊन मृत्युमुखी पडले. डॉ. नसीम अन्सारी यांचा मृत्यू शासकीय यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून त्यांच्या वारसांना शासनाने २५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी.

Pothole (File)
Tender Scam: टेंडर, ठेकेदार अन् टक्केवारी! 'बांधकाम'मधील भ्रष्टाचाराला चाप कधी लागणार?

भिवंडीतील रस्त्यांची स्थिती इतकी वाईट आहे की, जनतेच्या रोषाचा फटका स्थानिक लोकप्रतिनिधींना बसतो आहे. ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था, भिवंडी शहरातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी बैठक घेऊन जनआंदोलन पुकारण्याची वेळ आली आहे. विधानसभेत भिवंडीतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासंदर्भात अनेकदा चर्चा झाली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र भिवंडीतील रस्ते जैसे थे आहेत, असा आरोप शेख यांनी केला.

खराब रस्त्यामुळे भिवंडीतील अनेक बहुउद्देशीय कंपन्या त्यांची कार्यालये स्थलांतर करण्याचा विचारात आहेत. भिवंडी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्याप्रकरणी युद्धपातळीवर कार्यवाही आवश्यक आहे. येथील खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी ज्येष्ठ अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ नेमण्यात यावा. तरच भिवंडीकरांची खड्ड्यांच्या जाचातून सुटका होईल, अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com