Solapur  Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूरकरांनो, लगेच बुक करा विमानाचे तिकिट! शुक्रवार पासून...

Solapur Goa Air Connectivity : २६ मे पासून 'फ्लाय ९१' देणार विमान सेवा

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : सोलापूर ते गोवादरम्यान २६ मे पासून फ्लाय ९१ (Fly 91) या कंपनीच्यावतीने विमानसेवा सुरू केली जाणार आहे. कंपनीने तसा ई-मेल आम्हाला पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. (Solapur Goa, Solapur Airport, Fly 91, Star Air News)

या विमानसेवेची तिकिटे साधारणतः दहा दिवस अगोदर म्हणजे १६ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सोमवार आणि शुक्रवार अशी आठवड्यात दोनदा सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर विमानसेवा असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

गोवा येथून सकाळी ७.२० वाजता विमान सोलापूरकडे निघणार आहे. सोलापुरातून सकाळी ८.५० वाजता हेच विमान परत गोव्याकडे जाणार असल्याची वेळ नियोजित केली आहे.

सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर विमान प्रवासासाठी किती रुपयांचे तिकीट असणार आहे? याची माहिती मात्र विमान कंपनीने अद्याप दिलेली नाही. लवकरच ही माहिती देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.

२६ मेपासून होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. होटगीरोड विमानतळावर विमानसेवेच्या दिवशी पोलिस मनुष्यबळ देण्याचाही निर्णय झालेला आहे.

सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई मार्गावर विमानसेवा देण्यासाठी स्टार एअर (Star Air) कंपनीला टेंडर मिळाले आहे. सोलापुरातील होटगीरोड विमानतळावर टू-सी या वर्गवारीतील विमान उतरू शकतात. स्टार कंपनीकडे असलेली सर्व विमाने ही थ्री-सी या वर्गवारीतील आहेत. त्यामुळे टेंडर मिळूनही स्टार एअरकडून विमानसेवा सुरू झालेली नाही.

होटगीरोड विमानतळावर उतरू शकतील, अशी विमाने जर नसतील तर स्टार एअरने सोलापूरच्या विमानसेवेतून माघार घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या सूचनेनंतर स्टार एअर सोलापूरच्या विमानसेवेतून माघार घेण्याची शक्यता आहे. माघार घेतल्याचे पत्र अद्याप प्रशासनाला मिळालेले नाही. स्टार एअरने माघार घेतल्यास सोलापूर ते मुंबई या विमानसेवेसाठी फ्लाय ९१ कंपनीला नियुक्त केले जाऊ शकते.

या कंपनीकडे तशी विमाने आहेत, डीजीसीएकडून विमानसेवेचा परवानाही फ्लाय ९१ कंपनीला मिळालेला आहे. जून अखेरपर्यंत सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे.