water Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय एक तपानंतर पूर्ण; 12 वर्षांनंतर 882 कोटींच्या समांतर जलवाहिनीचे काम फत्ते

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : चारवेळा विकास आराखडा, तीन वेळा टेंडर रद्द, भूसंपादन प्रक्रिया रद्द अशा अनंत अडचणींवर मात करीत अखेर एक तपानंतर सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याच्या ८८२ कोटींच्या समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. शुक्रवारपासून (ता. १७) चाचणीला सुरवात होणार आहे. श्रेय लाटण्याच्या नादात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रकल्पात अनेक विघ्न निर्माण केल्याने अखेर प्रशासकीय कारकिर्दीत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले.

एकेकाळी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होणाऱ्या शहरात १९९८ पासून आठवड्यातून तीनदा, कधी आठवड्यातून दोनदा तर अलीकडे आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कमी व्हावी, या उद्देशाने समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पुढे आला. शहराची २०५० ची ३३ लाख लोकसंख्या गृहित धरून समांतर जलवाहिनीसाठी २०१३ मध्ये १ हजार २६० कोटींचा पहिला आराखडा तयार करण्यात आला. सरकारकडून या आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. एन.टी.पी.सी.कडून ही जलवाहिनी घालण्यात येणार होती. मात्र तत्कालीन आयुक्‍तांनी हा प्रकल्प स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्यासाठी याला खो दिला. तत्कालीन आयुक्‍त अविनाश ढाकणे यांनी या योजनेतील अनावश्‍यक गोष्टींना फाटा देत ४५० कोटींचा दुसरा विकास आराखडा तयार केला. याला स्मार्ट सिटी योजनेतून २०० तर एनटीपीसीकडून २५० कोटी निधी उपलब्ध करून देत या प्रकल्पाला ऑक्‍टोबर २०१८ मध्ये अंतिम मंजुरी मिळाली. टेंडर प्रक्रिया होऊन हैदराबादच्या पोचंमपाड कंपनीला सप्टेंबर २०१९ मध्ये कामाचा आदेश देण्यात आला. परंतु भूसंपादन झाले नव्हते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सरकार आले. ११० कि.मी. अंतराच्या भूसंपादनासाठी १४७ कोटींची आवश्यकता होती. मात्र याला देण्यास नकार देत शासनाने भूसंपादनासाठी अन्य पर्याय अवलंबण्याच्या सूचना दिल्या. भूसंपादन, इतर विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आदी तांत्रिक बाबी पूर्ण करून दीड वर्षानंतर ठेकेदाराला जमीन ताब्यात देण्यात आली. त्यानंतर ठेकेदाराने १०३ कोटी वाढीव रक्‍कमेची मागणी केली. मात्र करारामध्ये प्रकल्पाला वाढीव रक्‍कम देण्याची तरतूद नसल्याने ही रक्‍कम देण्यास स्मार्ट सिटी कंपनीने नकार दिला. अखेर तीन वर्षानंतर टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने फेरनिविदा प्रक्रिया करण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली. यातून प्रकल्प लांबणीवर पडला. त्यानंतर २०२३ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. दोनवेळा मुदतवाढ देऊन अखेर १२ वर्षांनी ११० कि.मी अंतराचे १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले.

८८२ कोटीमध्ये या कामांचा समावेश

यामध्ये ११० कि.मी अंतरावर १७० एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकणे. धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन, पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन, बीपीटी, ग्रॅविटी मेन, दाब नलिका, अशुद्ध पाण्याची उतार नलिका, ६३ क्रॉसिंग, भूसंपादन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची प्रक्रिया व जागेपोटी भाडेकरार मोबदला देणे, पाकणी जलशुद्धीकरण आदी कामांचा समावेश होता.

प्रकल्पाचा प्रवास

- ऑगस्ट २०१३ : समांतर जलवाहिनीसाठी १ हजार २६० कोटींचा पहिला विकास आराखडा तयार

- २३ ऑक्‍टोंबर २०१८ ः समांतर जलवाहिनीच्या ४५३ कोटींच्या दुसऱ्या विकास आराखड्याला अंतिम मंजुरी

- ८ सप्टेंबर २०१९ ः हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला ४५३ कोटींचे काम निश्‍चित करण्यात आले

- १ डिसेंबर २०२० ः सोरेगाव ते पाकणी या १७ कि.मी.च्या अंतरावर जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ

- - ११ नोव्हेंबर २०२१ ः स्मार्ट सिटी संचालक बैठकीत पोचमपाड कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय

- डिसेंबर २०२२ : मक्तेदाराची लवादामध्ये धाव

- मे २०२३ : लवादाचा निर्णय, आहे त्या टेंडर रकमेत काम करण्यास ठेकेदार तयार

- जून २०२३ : समांतरच्या कामाला सुवात, नोव्हेंबर २०२४ पर्यंत कामाची मुदत

- १४ मे २०२५ : समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण

अशी झाली निधीची पूर्तता

स्मार्ट सिटी : २५० कोटी

एनटीपीसी : २५० कोटी

राज्य शासन : २६७ कोटी

महापालिका : ११४ कोटी

एकूण : ८८२ कोटी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम आज पूर्ण होईल. गुरुवारी काँक्रिकरणाचे काम केले जाईल. त्यानंतर शुक्रवारपासून जलवाहिनीची चाचणी केली जाईल. १६ ते २० मे या कालावधीत वॉशआउट घेतले जाईल. त्यानंतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येईल.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग