मुंबई (Mumbai): कृष्णा नदीवरील भुयाचीवाडी (ता. कराड, जि. सातारा) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन कायमस्वरुपी बंधारा बांधण्याच्या मागणीचा विचार करून या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेज बंधाऱ्यात करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (मराठवाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणाले, कृष्णा नदीवरील भुयाचीवाडी (ता. कराड जि. सातारा) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस सुमारे ४५० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे.
पाण्याचा वेग आणि नदीतील प्रवाहामुळे या बंधाऱ्याचे वारंवार नुकसान होत असल्याने दरवर्षी यांत्रिकी पद्धतीने तात्पुरती दुरुस्ती करून भराव टाकण्याचे काम केले जाते. मात्र ही तात्पुरती उपाययोजना असल्याने या बंधाऱ्याचे बॅरेज बंधाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया शासनाने हाती घेतली आहे. या कामासाठी निधीची अडचण नाही.
या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचेही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
सदस्य अमित गोरखे यांनी विधान परिषदेत याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.