Sand Mining
Sand Mining Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar : मुळा नदीतील वाळू उपशाच्या टेंडरला अखेर स्थगिती

टेंडरनामा ब्युरो

नगर (Nagar) : मुळा नदीतील बारा गावांच्या शिवारातील वाळू उपसा करण्यासाठी प्रशासनाने काढलेल्या टेंडरला विरोध करत सरपंच व गावकऱ्यांनी तीव्र अंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासन अखेर नरमले. वाळू उपसा करण्यासाठीच्या निविदेला स्थगिती दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे समजताच गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील मुळा नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा सरकारी डेपो सुरू करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने अंमळनेर व निंभारी येथे वाळू डेपोची निर्मिती, साठा करणे, व्यवस्थापन व विक्रीबाबत वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध केल्या. मुळात नेवासा तालुक्यातील अंमळनेर, निंभारी, वांजळपोयी, शिरेगाव, खेडले परमानंद, करजगाव, खुपटी, पाचेगाव, इमामपूर, वाटापूर, आदी गावांत तीव्र विरोध सुरू झाला. अनेक वर्षापासून जपलेल्या वाळूचा उपसा होऊ नये यासाठी या भागातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेत वाळू उपशाला विरोध करून ठराव सरकारला पाठवले.

सरकारच्या टेंडर प्रक्रियेला सातत्याने विरोध करत निवेदनही दिली. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने टेंडर प्रक्रिया काढली. यामुळे या भागातील गावकरी संतप्त झाले. उपोषण करूनही दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पस्तीस वर्षांपासून वाळू उपसा न होऊ देता वाळू जपली, मात्र शासन आता वाळू नेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आक्रमक झालेल्या गावकऱ्यांमुळे प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आहे. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संपर्क केला. विखे पाटील यांनी मुळानदीतील वाळूची निविदा प्रक्रिया व उत्खनन करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. टेंडर प्रक्रिया स्थगित झाल्याचे समजताच जल्लोष साजरा करण्यात आला. सरपंच दत्तात्रेय वरुडे, सरपंच श्रीकांत पवार, सरपंच राजेंद्र राजळे, सरपंच निरंजन तुवर, तिळापूर, मांजरी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्ही अनेक वर्षांपासून वाळू उपसा होऊ दिला नाही. त्यामुळे आमच्या भागतील शेती समृद्ध आहे. कोणत्याही परिस्थिती या भागात वाळू उपसा होऊ देणार नाही. टेंडरला स्थगिती दिल्याबद्दल गावकरी समाधानी आहेत.
- ज्ञानेश्वर आयनर, सरपंच, अंमळनेर, ता. नेवासा, जि. नगर