Railway Track Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Railway Flyover : 'त्या' रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्गात भूसंपादनाचा खोडा; दीड वर्षापासून...

Shrigonda : भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू न करण्याची भूमिका ठेकेदाराने घेतली. भूसंपादन प्रक्रियेत मोठा वेळ जात असल्याने या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

टेंडरनामा ब्युरो

श्रीगोंदे (Shrigonda) : ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गावरील लिंपणगाव रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाच्या कामाचे कार्यारंभ आदेश होऊन दीड वर्ष उलटत आले आहे. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अद्याप या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही.

जामखेड-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक वाढली. त्यामुळे तालुक्यातील लिंपणगाव येथील रेल्वेगेटवर सतत वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी तिथे चारपदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी ९२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.

साधारणतः अकराशे ते बाराशे मीटर लांबीचा हा उड्डाणपूल असून त्यामध्ये दोन पदरी रुंदीचे दोन स्वतंत्र पूल म्हणजेच चौपदरी उड्डाणपुलाची उभारणी होणार आहे. शिवाय, सध्याच्या रस्त्याचे वळण वगळून सरळ उड्डाणपूल करण्यात येणार आहे.

साधारणतः जून २०२३ मध्ये या कामाची टेंडर प्रक्रिया झाली. कार्यारंभ आदेशही झाला. मात्र, उड्डाणपूल करण्यासाठी उपलब्ध जागेला ४५ मीटर रुंदी असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात, तिथे २० ते ३० मीटर रुंदी मिळत असल्याने भूसंपादन करणे गरजेचे होते. भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू न करण्याची भूमिका ठेकेदाराने घेतली.

भूसंपादन प्रक्रियेत मोठा वेळ जात असल्याने या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. भूसंपादनातील संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, निवाडा प्रक्रिया उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता संपादित करावयाच्या जागांवरील झाडांचे व विहिरींचे मूल्यांकन अनुक्रमे जिल्हा कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांकडून मिळण्यात जवळपास सहा महिन्यांचा कालावधी गेला आहे. १५ जानेवारी रोजी झाडे व विहिरींचे मूल्यांकन उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आता निवाड्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकूणच, संपादित करावयाच्या जागेतील झाडे व विहिरींचे मूल्यांकन अनुक्रमे जिल्हा कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांकडून मिळण्यात सहा महिने गेल्याने निवाडा प्रक्रिया रखडली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर या उड्डाणपुलाचे काम होण्याची गरज आहे.

भूसंपादन प्रक्रिया लवकर होण्यासाठी आमचाही पाठपुरावा सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तत्काळ काम सुरू करणार आहोत.

- लोभाजी घटमल, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग.