मुंबई (Mumbai): पंढरपूरच्या विकास आराखड्यात वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मागण्यांचा समावेश करून सर्वांना विश्वासात घेतच आराखडा अंतिम करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने पंढरपूरचा विकास केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन
पंढरपूरमध्ये भाविकांची संख्या वाढत असल्याने भविष्यातील गर्दीचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध डिजिटल टूल्सचा वापर करण्यात येईल. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन व प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी एकात्मिक नियोजनावर भर दिला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
विकास आराखडा शासनाकडून लादला जाणार नाही. पंढरपूरचे नागरिक आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या हिताचा विचार करूनच तो तयार केला जात आहे. स्थानिक नागरिक, आर्किटेक्ट्स आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून त्यातील शक्य त्या चांगल्या बाबी आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मंदिर-मठांचे स्थलांतर नाही
पंढरपूरमधील जुन्या मंदिरांचे आणि मठांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाईल. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विकास आराखड्यामुळे बाधित होणाऱ्या दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. बाधितांना योग्य पुनर्वसन करून ‘जागेस जागा’ देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने, तर ५०० हून अधिक बाधित घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना
धार्मिक स्थळांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास भाविकांची संख्या वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे पंढरपूरच्या विकासाकडे केवळ पायाभूत सुविधांचा विषय म्हणून न पाहता भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही पाहणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुढील अनेक दशकांचा विचार करून पंढरपूर अधिक सक्षम, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विकासाच्या प्रक्रियेत काही उणिवा राहिल्यास सूचना कराव्यात. सर्व घटकांनी परस्पर समन्वयातून काम करून पंढरपूरच्या विकासासाठी सर्वोत्तम मार्ग काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Key Points
पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम करणार
वारकरी, भाविक, नागरिक, व्यापारी आणि मठाधिपतींच्या सूचनांचा विचार करणार
लोकप्रतिनिधी आणि आर्किटेक्ट्सच्या सूचनांचाही आराखड्यात समावेश करणार
पुढील ५० वर्षांचा विचार करून पंढरपूरचा विकास करणार
गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल टूल्सचा वापर करणार
कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाही
विकासामुळे बाधितांचे पुनर्वसन करण्याला प्राधान्य देणार
बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने देण्याचे नियोजन
५०० हून अधिक बाधित घरांतील नागरिकांसाठी योग्य पर्याय उपलब्ध करणार
पंढरपूरच्या विकासातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न