सोलापूर (Solapur) : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या बाधित शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. संपादित जमिनींची विक्री करणे, विकसित करणे आदी प्रक्रिया ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
सुरत-चेन्नई या ग्रीन फिल्ड महामार्गासाठी जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील ७३९.४५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. २०२०- २०२१ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया २०२५ जवळ आले तरी पूर्ण होत नाही. तेव्हापासून हे बाधित शेतकरी भरडले जात आहेत. यातील ६८ गावांचे निवाडे भूसंपादन विभागाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या विभागीय कार्यालयाकडे पाठविलेले आहेत. मात्र, त्यापुढील प्रक्रिया न झाल्याने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे या जमिनीची शेतकरी विक्री करू शकत नाहीत किंवा विकसित करू शकत नाहीत. शहरालगतच्या जमिनी बिगरशेतीही करू शकत नाहीत तर ग्रामीण भागातील शेतकरी या शेतजमिनीवर कर्ज उचलणे, पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळविणे यापैकी काहीच करू शकत नाहीत. मोबदल्यासाठी बाधित शेतकरी भूसंपादन कार्यालयात सतत चकरा मारत आहेत. यामुळे सुरत-चेन्नई महामार्गमुळे महामार्गामुळे बाधित झालेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडले जात आहेत.
आमच्या जमिनी महामार्गासाठी घेऊन तीन वर्षे झाली. उताऱ्यावरील शेतकऱ्यांची नावेही कमी झाली. मोजणी झाली. बाधित जमीन निश्चित करून महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीवर खुणा करण्यात आलेल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांना तर नकाशाही मिळालेला नाही. यामुळे बाळे परिसरातील प्लेटिंग व विक्री सर्व व्यवहार ठप्प आहेत.
- यशवंत ढेपे, बाधित शेतकरी, बाळे
भारतमाला योजनेअंतर्गंत सुरत-चेन्नई या मार्गाचा समावेश होता. योजनेची मुदत संपली असली तरी राष्ट्रीय महामार्गाच्या इतर योजनेतून या मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. हा प्रश्न फक्त सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नसून चेन्नई ते सुरतपर्यंतच्या विविध राज्यातील अनेक जिल्ह्यांचा आहे. यामुळे अजून सरकारचा काही निर्णय झाला नसला तरी लवकरच निर्णय होईल.
- राकेश जवादे, प्रकल्प संचालक, एनएचएआय
एनएचआयकडे निवाडे पडून
भूसंपादन कार्यालयाकडील सर्व प्रक्रिया पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे पाठविण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२३ पाठविलेले प्रस्तावांपैकी ४० पेक्षा जास्त गावांतील शेकडो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. एनएचएआयच्या विभागीय कार्यालयाकडे पेडिंग असल्याची माहिती भूसंपादन विभागाकडून देण्यात आली. मात्र एनएचएआयचे कार्यालय याबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे.
या गावाचे निवाडे पडून
स्पर कनेक्टीव्हिटीसाठी घेण्यात आलेल्या बोरमणी, कुंभारी, होटगी, संगदरी, हत्तूर, मुस्ती (ता.दक्षिण सोलापूर) तरटगाव, मार्डी, बाळे, गुळवंची, बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) ट्रम्टेटसाठी तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी नगर, केगाव (ता. उत्तर सोलापूर) अलिपूर, वैराग (ता. बार्शी) राष्ट्रीय महामार्गासाठी तांदूळवाडी, डोंबरजवळगे, चपळगाव, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, बोरगाव (ता. दक्षिण सोलापूर), काळेगाव, सासुरे (ता. बार्शी ) या गावातील शेतकऱ्यांचे निवाडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या मुंबई येथील विभागीय कार्यालयाकडे पडून आहेत.
नुकसान भरपाईचा घोषवारा
तालुका बाधित संपादित क्षेत्र मंजूर निधी नुकसान भरपाई नुकसान भरपाई त्रुटी आढळलेली
गटसंख्या (हेक्टर) (कोटीत) मागणीचे प्रस्ताव मंजूर प्रकरणे प्रकरणे
अक्कलकोट ४४० २५७.३२ १८२.४८ ४२४ ४०४ १३
बार्शी ५९२ १८७.२३९ १४८ ३५१ ३३० १४
दक्षिण सो. ३९० २८८.७८ १९४.१४ २८२ २७० ७
उत्तर सो. ७ ६.८ २० ८ ७ १
एकूण १४२९ ७३९.४५ ५५७३ ५३४.८ १०११ ३५