जयसिंगपूर (Jaysingpur, Kolhapur) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकरी आणि बधितांकडून चौपट भरपाई आणि सध्या असलेल्या उदगाव बायपासवरूनच होणारा महामार्ग न्यावा, अशा दोन मुख्य मागण्यांसाठी वर्षभरापासून आंदोलने केली जात आहेत.
असे असताना महामार्गातील चोकाक ते उदगाव, अंकली दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याची टेंडर प्रक्रिया केंद्र शासनाने जारी केली आहे. दहा गावांतील शेतकऱ्यांचा याला विरोध असल्याने शासन निर्णयाविरोधात भारतीय किसान संघाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
२०१२ पासून कोल्हापूर-सांगली महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे. यापूर्वी चोकाक ते उदगाव-अंकली वगळता अंकली ते नागपूर याचे काम पूर्ण झाले असून, चोकाक ते रत्नागिरीपर्यंतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेल्या एक वर्षापासून चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंत जमीन हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याला शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील दहा गावांतील शेतकरी व बाधित नागरिकांनी तीव्र विरोध करून चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून हा महामार्ग न्यावा, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्नी सातत्याने विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत.
चोकाक ते उदगाव-अंकली मार्गातील बाधित शेतीला चौपट भरपाई मिळावी व उदगाव बायपास महामार्गावरून हा नवीन महामार्ग न्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. अशातच राष्ट्रीय रेस्ते प्राधिकरण विभागाने चोकाक ते उदगाव-अंकली या मार्गातील त्रुटी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याअगोदर टेंडर प्रसिद्ध केल्याने उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.
- सिद्धार्थ शिंदे, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ