Solapur Airport Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : विमानसेवा सुरु होण्याचा मुहूर्त पुन्हा चुकला; नियोजन हवेतच...

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : सोलापूरहून विमानसेवा सुरु होण्याचा सोमवारचा (ता. २३) मुहूर्त पुन्हा चुकला आहे. यासाठीचे नियोजन हवेतच असल्यामुळे विमानसेवा अद्याप जमिनीवरच आहे. मुळात विमानतळावर इंधनाचा साठा करण्याची सोय नाही. ‘फ्लाय ९१’ विमान कंपनीने अतिरिक्त इंधनासह उड्डाण करण्यास असमर्थता दर्शविली. या कंपनीकडे मनुष्यबळही पुरेसे नाही. याशिवाय इतर काही तांत्रिक कारणांमुळे हवाई वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगीच अद्याप मिळालेली नाहीत.

सोलापूर विमानतळावरून रोज दोन विमानांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. यात गोवा ते मुंबई व मुंबई ते गोवा अशा विमानांच्या थांब्याचा समावेश आहे. यासाठी लागणारे इंधन हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून घेतले जाणार आहे. ‘एटीएफ’ (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) प्रकारच्या इंधनाचा पुरवठा करण्यासाठी करारही झाला आहे. मात्र विमानतळावर इंधनाचा साठा करण्यासाठी टाकीच नाही. त्यामुळे इंधनाचा साठा कुठे करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्याहून सोलापूरला इंधनाचा पुरवठा करण्यासाठी ‘बॉवसर’ या विशिष्ट वाहनाचा वापर केला जाईल.

टाकीचा जागा निश्चित

दरम्यान, इंधनाची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जागाही निश्चित केली आहे. हे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

विमानसेवेतील विघ्ने

- पाच विमानतळांवर सेवा सुरु केलेल्या ‘फ्लाय ९१’ कंपनीकडे सोलापूरहून सेवा सुरु करण्यासाठी कर्मचाऱ्यांची अद्याप नेमणूक नाही

- इंधनाचा साठा करण्यासाठी टाकीचे अद्याप काम सुरु नाही

- काही तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्याने ‘डीजीसीए’कडून परवानगी नाही

- विमान कंपनीकडून नव्या विमानाचा वापर शक्य, मात्र त्याची नोंदणी अद्याप ‘डीजीसीए’कडे नाही

- विमानतळाने विमान कंपनीला आकारलेले शुल्क

...तर विमानसेवा तोट्यात

सोलापूर विमानतळावर इंधनाची उपलब्धता झाली नाही तर कंपनीला विमानात अतिरिक्त इंधन घेऊन उड्डाण करणे भाग पडेल. तसे झाल्यास प्रवासी संख्या कमी करणे अटळ असेल. त्यामुळे कंपनीच्या एकूण उत्पन्नावरच परिणाम होईल आणि विमान कंपनी तोट्यात जाईल. तसे झाल्यास विमानसेवेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.

इंधनासंदर्भात तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. तो लवकरच सोडविला जाईल. येत्या १५ दिवसांत सोलापूरहून विमानसेवा सुरु होईल. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करू.

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

सोलापूरहून विमानसेवा सुरु होण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याशिवाय विमान कंपनीला आकारल्या जाणाऱ्या शुल्कात सुरवातीचे काही महिने तरी सूट देणे अपेक्षित आहे

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ, पुणे