सातारा (Satara) : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा मानबिंदू ठरणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. एकूण सुमारे १३ हजार कोटींचा या प्रकल्पाची अंमलबजावणी एमएसआरडीसी करत आहे; पण कोअर झोनमध्ये हा प्रकल्प येत असल्याने याला केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळणार का, तसेच जागा वन्य जीव विभागाची असूनही त्यांना याबाबतच्या समितीत सामावून घेतले गेलेले नाही, तसेच या प्रकल्पात समाविष्ट गावांत नेमका काय विकास केला जाणार याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे.
काय आहे प्रकल्प
नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे. या गिरिस्थानावर येणारा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने नवीन गिरिस्थान विकसित करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
खर्च किती होणार...
सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पात टुरिस्ट पॅराडाईज, पर्यटन आणि निसर्ग संपदा विकास केंद्रांचा विकास साधून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोप वे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
तीन व्यावसायिक विमानतळे...
नवीन महाबळेश्वरमध्ये तीन व्यावसायिक विमानतळे प्रस्तावित आहेत. यामध्ये बाजे येथे धावपट्टी, तर उरमोडी, तापोळा येथे 'सी प्लेन' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किमी ते दोन किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्यात येणार आहे. बाजे विमानतळामुळे वाल्मीकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल. उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे, तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे, तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे. उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना काही वेळेतच पोहोचता येणार आहे.
पर्यावरण रक्षणासाठी अपारंपरिक वाहने...
हिल ट्रेन (टॉय ट्रेन), अपारंपरिक वाहने आणि केबल सिस्टिमसह अद्वितीय वाहतुकीचे पर्याय देखील असतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आध्यात्मिक प्रवास, जलक्रीडा, ट्रेकिंग आणि झिप-लाइनिंग यांसारख्या उपक्रमांची ऑफर करून, पर्यावरण पर्यटनावरही योजना केंद्रित आहे.
रोजगार आणि विकासाच्या संधी...
नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पात एमएसआरडीसीने २९३ गावांचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे. मूळ प्रस्तावात सातारा जिल्ह्यातील २३५ गावांचा समावेश असून, १,१५३ चौरस किलोमीटर पसरलेले नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र चार नियोजन विभागांमध्ये विभागले गेले आहे. पर्यटन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने १३ पर्यटन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे. या प्रकल्पांतर्गत काही गावांत औषधी वनस्पती आहेत. काही गावांमध्ये साहसी पर्यटनाची क्षमता आहे आणि काही पर्यटन स्थळे बनू शकतात. जमिनीचे नुकसान न होता रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत गावकऱ्यांनी मागणी असून, या मागण्यांच्या आधारे नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
बोटिंगसाठी याबाबी आवश्यक
कोयना धरण परिसरात असलेल्या बॅक वॉटरमध्ये नऊ किलोमीटरपर्यंत बोटिंगला परवानगी नाही. या पुढच्या भागात बोटिंगला परवानगी घेणे, तसेच बोटींसाठी धक्का बांधण्यासाठी कोअर झोनमधील मालकीच्या जमिनीचा वापर होणार आहे. त्यासाठी ऑफिसिअल सिक्रेट ॲक्टमध्ये शिथिलता होणे आवश्यक आहे, तसेच कोअर झोनची जमीन ही वन जीव विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यांच्याकडून परवानगी घेणे किंवा त्यांना या प्रकल्पात सामावून घेण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे. पाटण तालुका नावाला ठेऊन केवळ जावळी व महाबळेश्वर तालुक्यातच हा प्रकल्प राबविला जाणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत संभ्रम
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हेच तालुके येत असून, त्यामध्ये समाविष्ट गावांचे पुनर्वसन केले जात आहे; पण त्यातील काही गावांचा नवीन महाबळेश्वरमध्येही समावेश होत आहे. यातील मळे, कोळणे, पातरकुंज या गावांत नियोजित विकास आराखड्यातून कोणती कामे होणार, तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांना नवीन महाबळेश्वरमध्ये शिथिलता आहे का? याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे या परिसरातील गावांत संभ्रमाचे वातावरण आहे.