Pandharpur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी बीव्हीजीकडे; वादग्रस्त रक्षक कंपनीचा ठेका अखेर रद्द

टेंडरनामा ब्युरो

पंढरपूर (Pandharpur) : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपच्या खांद्यावर देण्यात आली आहे. रक्षक कंपनीचा ठेका रद्द करण्यात आल्यानंतर यापुढे बीव्हीजी ग्रुपकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येतात. त्यामुळे दर्शन बारीसह मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच इतर सुरक्षेसाठी मंदिर समितीने सुरक्षा रक्षक पुरविण्याची निविदा काढली होती. यामध्ये ५ कोटी ७७ लाख रुपयांचा ठेका बीव्हीजी ग्रुपला मिळाला आहे. १ जूनपासून मंदिराची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी बीव्हीजीकडे येणार आहे. यापूर्वी रक्षक कंपनीला सुरक्षेचा ठेका देण्यात आला होता. परंतु ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतरही सुधारणेसाठी कंपनीला संधी दिली होती. परंतु तक्रारी अधिक वाढल्याने मध्यंतरी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या रक्षक कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला होता.

नवीन सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी मंदिर समितीने निविदा प्रसिद्ध केली होती. विविध राज्यातून आठ एजन्सीने सहभाग घेतला होता. यामध्ये सर्व नियमांची आणि अटी शर्तीची पूर्तता केल्यामुळे बीव्हीजी ग्रुपला सुरक्षा रक्षक पुरविण्याचा ठेका मिळाला आहे. नियम व अटीनुसार मंदिर समितीला २२० सुरक्षा रक्षक पुरविले जाणार आहेत. याशिवाय प्रमुख चार यात्रांबरोबरच गर्दीच्या काळात अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचीही अट घालण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिकांचाही समावेश बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत शिस्त येणार आहे. मंदिरातील अंतर्गत सुरक्षा आता बीव्हीजीकडे आल्याने व्हीआयपी दर्शनाबरोबरच दर्शनाचा काळा बाजार रोखला जाईल, अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.