Tourism Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

'ब्रिटिशकालीन वारसा' ते 'ग्लोबल डेस्टिनेशन'; सह्याद्रीच्या कुशीत उलगडणार पर्यटनाचे नवे क्षितीज

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, फेसाळणारे धबधबे आणि निळेशार पाणी लाभलेले भंडारदरा धरण आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. २०२६ पासून सुरू होणारे धरणाचे 'शताब्दी वर्ष' या परिसराचा कायापालट करणारा एक 'मास्टर प्लॅन' ठरणार आहे.

भंडारदरा धरणाची भिंत ही अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना मानली जाते. आता याच भिंतीवर रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या झोतात धरणाचा इतिहास आणि उभारणीची गाथा उलगडणार आहे. ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करतानाच, तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक डिजिटल डॉक्युमेंटरी आणि बसण्यासाठी नैसर्गिक 'ॲम्फीथिएटर'ची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे पर्यटकांना केवळ निसर्गच नाही, तर या मातीचा इतिहासही अनुभवता येईल.

भंडारदरा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो विलोभनीय 'अम्ब्रेला फॉल'. मात्र, तो केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित न ठेवता, पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशीही तो प्रवाहित ठेवण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.

याशिवाय, विस्कळीत असलेली बोटिंग सेवा आता अधिकृत 'बोटिंग क्लब'च्या माध्यमातून शिस्तबद्ध केली जाईल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट्स आणि रेस्क्यू बोट्सचे कडक नियम लागू करून जलपर्यटनाला जागतिक दर्जा देण्याचे नियोजन आहे.

या संपूर्ण आराखड्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 'स्थानिक रोजगार' होय. पर्यटनामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये म्हणून खासगी वाहनांना धरण परिसरात बंदी घालून तिथे इलेक्ट्रिक बसेस किंवा गोल्फ कार्ट्स सुरू केल्या जाणार आहेत. हे वाहन चालवण्याची जबाबदारी स्थानिक तरुणांकडे असेल.

जलसंपदा विभागाने अतिक्रमणमुक्त केलेली १८ हेक्टर जागा आता पर्यटनाच्या विविध उपक्रमांसाठी वापरली जाईल. तिथे आदिवासी बांधवांच्या हस्तकला, वनौषधी आणि स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भंडारदरा हा परिसर कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि रतनगड यांसारख्या ट्रेकिंग पॉईंट्सनी वेढलेला आहे. नवीन आराखड्यात केवळ धरणच नाही, तर या ट्रेकिंग मार्गांवरही पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला आहे.

जुन्या चित्रपटांच्या आठवणी जपणारे म्युझियम आणि ऐतिहासिक नकाशांचे प्रदर्शन यामुळे दुर्गप्रेमी आणि सिनेप्रेमी दोघांसाठी ही पर्वणी ठरेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संपूर्ण महोत्सवावर लक्ष ठेवून आहे. 'ड्रिप' आणि राज्य सरकारचा विशेष निधी यातून हा परिसर चकाचक केला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत सादर होणारा 'अंतिम मास्टर प्लॅन' हा भंडारदराच्या पुढील १०० वर्षांच्या प्रगतीची पायाभरणी करणारा ठरणार आहे.