Road Tendernama
मुंबई

वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड भूसंपादन सुरू; तब्बल 16 हजार कोटींचे बजेट

BMC: उत्तर मुंबईतील वाहतुकीचा कणा ठरू शकणाऱ्या वर्सोवा ते दहिसर या पुढील टप्प्याचे काम हाती घेतले आहे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईमध्ये सध्या मरिन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या सागरी किनारा मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, आता महापालिकेने (BMC) उत्तर मुंबईतील वाहतुकीचा कणा ठरू शकणाऱ्या वर्सोवा ते दहिसर या पुढील टप्प्याचे काम हाती घेतले आहे.

अंदाजे २२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील नागरिकांचा प्रवास वेगवान आणि झटपट होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च १६ हजार ६२१ कोटी रुपये इतका आहे.

राजधानी मुंबईसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवासाला वेग देण्यासाठी लवकरच वर्सोवा ते दहिसर असा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग तयार होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेने आता मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्याची तयारी सुरू केली आहे.

हा संपूर्ण प्रकल्प सहा टप्प्यांत विभागलेला आहे, ज्यामुळे कामाला गती मिळेल. यामध्ये काही पट्ट्यात दुहेरी उन्नत मार्ग असणार आहे, तर काही ठिकाणी खाडीखालून बोगद्याद्वारे मार्ग काढला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सागरी मार्गाला गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची देखील जोडणी दिली जाणार आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या विशाल प्रकल्पासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासह त्याच्याशी संलग्न असलेल्या अन्य रस्त्यांच्या आणि पूलांच्या कामासाठी पालिकेला एकूण ३५० हेक्टर जमिनीचे संपादन करायचे आहे. यात केवळ सागरी मार्गासाठी सुमारे २०० हेक्टर जमीन लागणार आहे. यामध्ये सरकारी जमिनीसोबतच खासगी जमिनीचाही समावेश आहे.

या भूसंपादनाच्या कामाला वेग देण्यासाठी, तसेच विविध शासकीय परवानग्या आणि मंजुरी मिळवण्याकरिता महापालिकेने एका सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने टेंडर देखील काढली आहे.

या कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत केवळ मुख्य मार्गच नव्हे, तर परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अनेक संलग्न कामेही केली जाणार आहेत. यात मढ ते वर्सोवा खाडी पूल बांधला जाईल. तसेच, मालाड पश्चिम आणि कांदिवली परिसरातील नेहमीची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मालाड-मार्वे-मनोरी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त, सेवा रस्ते आणि विकास नियोजनांतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांचीही कामे केली जाणार आहेत, ज्यामुळे या संपूर्ण परिसरातील दळणवळण अधिक सुरळीत होईल.

वर्सोवा ते दहिसर हा २२ किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग सहा टप्प्यांमध्ये विकसित केला जाईल. या सहा टप्प्यांमध्ये रस्ते, उड्डाणपूल आणि केबल स्टेट पूल यांचा समावेश आहे. वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर घालणार असून, यामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

हा सागरी मार्ग असा होणार

  • पहिला टप्पा: वर्सोवा ते बांगूर नगर.

  • दुसरा टप्पा: बांगूर नगर ते माईंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणी.

  • तिसरा टप्पा: माईंड स्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडील बोगदा.

  • चौथा टप्पा: चारकोप ते माईंड स्पेस मालाड दक्षिणेकडील बोगदा.

  • पाचवा टप्पा: चारकोप ते गोराई.

  • सहावा टप्पा: गोराई ते दहिसर.