मुंबई (Mumbai): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी 'ठाणे-बोरिवली ट्विन-ट्यूब बोगदा' प्रकल्प सध्या अत्यंत वेगाने आकार घेत आहे.
अंदाजे 16,600 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे महत्त्व केवळ दळणवळणाच्या सुलभतेपुरते मर्यादित नाही, तर जगातील कोणत्याही शहरी भागातील सर्वात मोठ्या आरक्षित वनक्षेत्रामधून (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) हा मार्ग जात असल्याने तो अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय दृष्टीने एक जागतिक मापदंड ठरणार आहे.
सध्या मानपाड्याजवळ (ठाणे) कामाला सुरुवात झाली असून, प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराखालून प्रत्यक्ष बांधकाम डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन वापरले जाईल आणि टीबीएम वापरून बांधलेला हा सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या नैसर्गिक महत्त्वामुळे, खोदकाम करताना अत्यंत कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.
हा महत्त्वाकांक्षी मार्ग बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि घोडबंदर रोड मार्गे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना थेट जोडेल. हा प्रकल्प तीन वर्षांच्या मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पूर्ण झाल्यानंतर 'ठाणे-बोरिवली ट्विन-ट्यूब बोगदा' भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बोगद्याची रचना करताना 'हरित मार्ग' या संकल्पनेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हा प्रकल्प कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कार्बन उत्सर्जन 36 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी अंदाजे 10.5 लाख मेट्रिक टन इंधनाचा वापर कमी होणार आहे.
बोगद्यात हवा खेळती रहावी, यासाठी व्हेंटिलेशन, स्मोक डिटेंन्शन, जेट फॅन्स आणि ड्रेनेजची विशेष प्रणाली बसवली जाणार आहे, ज्यामुळे सुरक्षितता आणि पर्यावरणाचे नियम पाळले जातील. हा मार्ग दोन समांतर टनलचा असेल, प्रत्येक टनलमध्ये दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन (एकूण तीन लेन) असतील.
एमएमआरडीएने हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये विभागला आहे...
पॅकेज 1: बोरिवली बाजूस 5.75 किमी बोगदा
पॅकेज 2: ठाण्याच्या बाजूस 6.05 किमी बोगदा
पॅकेज 3: एअर, व्हिजन, अग्निसुरक्षा, ड्रेनेजसह विद्युत आणि यांत्रिक प्रणालीचे काम.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
लांबी: एकूण 11.8 किमी (10.25 किमी बोगदा + 1.55 किमी अप्रोच रोड).
प्रवासाचे अंतर: 12 किमीने कमी होणार.
वेळेची बचत: 40 ते 45 मिनिटांची बचत होणार.
वेग मर्यादा: बोगद्यातून वाहने 80 किमी/तास वेगाने प्रवास करू शकतील.