
पुणे (Pune): आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकादरम्यानच्या अरुंद रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.
पुणे रेल्वे स्टेशन, मालधक्का, ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ‘आरटीओ’सह अन्य महत्त्वाची ठिकाणे असल्याने आरटीओ चौक आणि शाहीर अमर शेख चौकात कायम वर्दळ असते. या दोन्ही चौकांना रेल्वेच्या भुयारी मार्गाने जोडले आहे.
भुयारी मार्ग १०० वर्षांपेक्षा अधिक जुना असून, सुमारे पाच मीटर रुंदीचा आहे. रुंदी कमी असल्याने दोन्ही चौकांत वाहतूक कोंडी होते. कोंडीत अडकल्याने रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे चुकण्याची भीती असते. त्याचप्रमाणे भुयारी मार्गाची उंची कमी असल्याने मालधक्क्याकडे जाणाऱ्या ट्रकची वाहतूक होऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही चौकांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला पत्रही पाठवले आहे.
‘आरटीओ’कडून मंगळवार पेठेकडे येणाऱ्या बाजूने रेल्वेची जागा उपलब्ध आहे. रेल्वेने जागा दिल्यास तेथे नऊ ते १० मीटर रुंदीचा नवा भुयारी मार्ग करणे व जुना भुयारी मार्गही मोठा करून रुंदी वाढविणे, दोन्ही बाजूने मिळून किमान २० मीटर रुंदीचा बोगदा उपलब्ध व्हावा, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. हा भुयारी मार्ग मोठा झाल्यास वाहतूक कोंडी कायमची सुटू शकते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रकल्प विभागाने टेंडर काढले आहे. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत प्रकल्प आराखडा सादर होईल. त्यात भुयारी मार्ग कसा करता येईल, त्यासाठी किती खर्च येईल, जागा किती लागेल, हे स्पष्ट होईल.