मुंबई (Mumbai) : मुंबईत येणाऱ्या आमदारांच्या निवासासाठी बांधण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासाच्या कामास गती देऊन ते जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले.
मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून शुक्रवारी नागपूर येथील विधानभवनात घेण्यात आला. या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदींसह लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले.
नार्वेकर म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ‘मनोरा’ आमदार निवासाच्या बांधकाम आराखड्यात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे हरित पट्टा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या सुविधांचे ठिकाण आणि क्षेत्र यामध्ये बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कामाच्या स्वरूपात झालेला बदल आणि त्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. मनोरा इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढवून ठरलेल्या वेळेच्या आता सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत,’’ असे निर्देशही नार्वेकर यांनी दिले.