मुंबई (Mumbai) : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) 1310 खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी देण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढलेली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.
भाडेतत्त्वावर खासगी बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जातोय, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. यात 2 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मे. अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि., मे. सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा.लि. आणि मे. ट्रॅव्हल टाइम प्रा. लि. या तीन कंपन्यांना टेंडर दिले असून या दिल्ली, गुजरात तामिळनाडूच्या कंपन्या आहेत.
त्यामुळे प्रति वर्ष 2 हजार 800 कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार आहे. सरकारने या निर्णयाला स्थगिती देताना पुन्हा एकदा याच्या जास्त पेक्षा दर येऊ नये, असेही दानवे म्हणाले. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अशाप्रकारे उधळपट्टी होऊ नये, असे खासगी बसेस भाडे खरेदीच्या निर्णयावर दानवे यांनी म्हटले.