मुंबई (Mumbai): राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांतील नुकसान झालेले रस्ते आणि पूल तातडीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. आवश्यक ठिकाणी आधी तात्पुरत्या उपाययोजना करून त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रस्ते-पुलांची दुरुस्ती, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील कामे, महामार्गालगतची जनसुविधा केंद्रे आणि ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025–2047’च्या जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रस्ते बांधणीचे नियोजन
अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहून गेलेले रस्त्याचे भाग, पुलांचे नुकसान आणि अन्य संरचनात्मक त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक परिस्थिती, पर्जन्यमान आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार करून दुरुस्ती व पुनर्बांधणीचे नियोजन करण्यासही सांगण्यात आले.
भविष्यातील पर्जन्यमानाचा विचार करून रस्ते बांधणी व दुरुस्तीचे आराखडे तयार करावेत. रस्त्यांवर पाणी साचणार नाही, पाण्याचा योग्य निचरा होईल आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान कमी होईल, अशा पद्धतीने कामांचे नियोजन करण्यावर भर द्यावा, असे भोसले यांनी सांगितले.
रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनालाही चालना देण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुकूल वृक्षप्रजातींची निवड करून लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
नाशिक कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा
आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घोटी–त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक रिंग रोड, ओझर विमानतळाशी संबंधित कामे, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील गेस्ट हाऊस, त्र्यंबकेश्वरमधील डी.पी. रस्ते आणि भूसंपादन प्रक्रियेचा यात समावेश होता.
कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत आणि कोणत्याही कारणामुळे विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गुणवत्तेशी तडजोड नको
रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, तांत्रिक निकषांचे पालन आणि प्रत्यक्ष पाहणी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले. कामे वेळेत पूर्ण करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, अशी स्पष्ट सूचना भोसले यांनी केली.
महामार्गालगत प्रस्तावित जनसुविधा केंद्रांची कामेही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
2047 पर्यंतच्या रस्ते विकासाचा आराखडा
‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025–2047’ अंतर्गत जिल्हानिहाय रस्ते विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला. रस्ते नेटवर्क, प्रमुख मार्गांची गरज, वाहतूक वाढीचा अंदाज तसेच औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्योन्मुख नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव बांधकाम आबासाहेब नागरगोजे, सचिव रस्ते शरद राजभोज तसेच विभागाचे मुख्य अभियंते उपस्थित होते. राज्यातील सर्व अधीक्षक अभियंते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
Key Points
अतिवृष्टीग्रस्त रस्ते-पुलांच्या दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य.
आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजनांनंतर कायमस्वरूपी दुरुस्ती.
भविष्यातील पर्जन्यमान लक्षात घेऊन रस्ते बांधणीचे नियोजन.
पाणी न साचण्यासाठी योग्य Drainageवर भर.
नाशिक कुंभमेळ्याच्या कामांना विलंब न करण्याचे निर्देश.
घोटी–त्र्यंबकेश्वर मार्ग आणि नाशिक Ring Roadचा आढावा.
ओझर विमानतळाशी संबंधित कामे आणि भूसंपादन प्रक्रियेचा आढावा.
रस्ते-पुलांच्या कामांच्या गुणवत्तेशी तडजोड न करण्याच्या सूचना.
महामार्गालगतच्या जनसुविधा केंद्रांच्या कामांना गती.
‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025–2047’चा जिल्हानिहाय आढावा.