Mira Road
Mira Road Tendernama
मुंबई

Mumbai : मीरा रोड स्टेशन हायटेक; पहिल्या टप्प्यात ६५ कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी १२५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर हा विकास होणार असून पहिल्या टप्प्यात मिरा रोड रेल्वे स्थानकासाठी ६५ कोटीची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेच्या एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी ३ए प्रकल्पांतर्गत मिरा रोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.

भाईंदर व मिरा रोड रेल्वे स्थानकांचा एमयूटीपी प्रकल्पांतर्गत विकास केला जाणार आहे. बोरिवली स्थानकाप्रमाणे या दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात मिरा रोड रेल्वे स्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मिरा रोड रेल्वे स्थानकात उत्तर दिशेला असलेली तिकीट खिडकी या आधी पादचारी पुलावरती होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मनस्ताप होत होता. ही तिकीट खिडकी खाली फलाटाजवळच असावी, अशी प्रवाशांची मागणी होती; पण संबंधित जागा मिरा-भाईंदर महापालिकेची असल्यामुळे तिकीट खिडकी बांधण्यात अडचण येत होती. खासदार राजन विचारे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक सत्यकुमार व महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. त्यावेळी तिकीट खिडकीसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना विचारे यांनी केली होती.

खासदार विचारे यांनी केलेल्या सूचनेनंतर महापालिकेने यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्या ठिकाणी तिकीट खिडकी बांधण्यात आली तसेच रेल्वे कार्यालयासाठी जागा व कर्मचाऱ्‍यांसाठी स्वच्छतागृहासाठी देखील जागा उपलब्ध झाली आहे. नव्या नव्या तिकीट खिडकीमुळे मिरा रोडच्या विविध भागातून बसने रेल्वे स्थानकात येणाऱ्‍या प्रवाशांचा मोठा त्रास वाचणार असल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त मिरा रोड रेल्वे स्थानकात सध्या बारा एटीव्हीएम यंत्रे असून त्यांची संख्या तीनने वाढविण्यात येणार आहे, नवीन पादचारी पुलाचे काम सुरू होणार आहे तसेच क्रमांक एकच्या फलाटावर नवीन स्वच्छतागृहाचे कामही सुरु करण्यात आले आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकात भाईंदर पश्चिमेकडे सुरू असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्या ठिकाणीही नवीन तिकीट खिडकी सुरू होणार असून एटीव्हीएम यंत्रांची संख्या चारने वाढवण्यात येणार आहे; तसेच पश्चिमेकडील प्रवाशांसाठी दोन सरकते जिने, एक लिफ्ट व स्वच्छतागृहाचे काम सुरू होणार आहे.